सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्यासंदर्भात दिलेल्या यापूर्वीच्या आदेशांमध्ये सुधारणा करण्यास नकार दिला. डिसेंबर २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिले होते. तसेच न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला राष्ट्रीय ध्वज नियमावलीत बदल करण्याच्या सूचनाही दिल्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जानेवारीला होणार आहे.

राष्ट्रगीत : इतिहास आणि वर्तमान

यापूर्वी १ डिसेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचे पालन करण्यासाठी देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे आदेश दिले होते. चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले जावे आणि ते सुरू असताना सर्वांनी उभे राहावे, असे आदेशात म्हटले होते. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी शिक्षेची निश्चिती करण्यात आली नव्हती. तसेच कोणत्याही वस्तूवर राष्ट्रगीत छापू नये. याशिवाय, राष्ट्रगीताचा अवमान होईल, अशा पद्धतीने ते कुठेही दाखवले अथवा प्रदर्शित केले जाऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने यासंदर्भात आणखी काही निर्देश जारी केले होते. राष्ट्रगीत हा चित्रपट किंवा माहितीपटाचा भाग असेल तर चित्रपटगृहातील प्रेक्षकांना त्याच्या सन्मानार्थ उभे राहण्याची गरज नाही, अशी सुधारणा यावेळी करण्यात आली.