अध्यादेशास स्थगितीची मागणी न्यायालयाने फेटाळली
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा ‘नीट’ परीक्षेतून सूट देण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
या अध्यादेशाद्वारे केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना एक वर्ष ‘नीट’मधून सूट दिली आहे. त्यामुळे या परीक्षेबाबत आधीच असलेल्या गोंधळात भर घालण्याची गरज नाही, असे स्पष्ट करीत न्यायाधीश पी. सी. पंत आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन अध्यादेशास अंतरिम स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली. या याचिकेवर उन्हाळी सुटीनंतर सुनावणी घेण्याचे संकेत न्यायालयाने दिले.
‘नीट’बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाला याचिकाकर्ते आनंद राय यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र हा अध्यादेश फक्त वर्षभरापुरताच सीमित असल्याचे नमूद करतानाच महाधिवक्ते मुकुल रोहतगी यांनी सरकारला असा अध्यादेश काढण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.