नेपाळमध्ये बसलेल्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनी हिमालय परिसर देखील हादरला. भूकंपानंतर एव्हरेस्टवर झालेल्या हिमस्खलनाचा विध्वंसक व्हिडिओ एका जर्मन गिर्यारोहकाच्या कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हिमस्खलनाचे भयानक वास्तव दाखवणारा हा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. सुरूवातीला भूकंपाचे हादरे बसत असल्याची जाणीव जर्मन गिर्यारोहक जोस्ट कोबुश याला झाली. त्यानंतर आपल्यादिशेने काहीतरी मोठी वस्तू येत असल्याची कल्पना येते आणि काही सेकंदात मोठी बर्फाची लाट सर्व उद्ध्वस्त करून जाते. गिर्यारोहक जोस्ट स्वत:चे रक्षण करण्यासाठी त्वरित तंबूचा आसरा घेतो आणि ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीनुसार जोस्ट नशीबवान ठरला. बर्फाच्या या भयानक लाटेतून तो बचावला मात्र तंबूतून बाहेर आल्यानंतर सहकारी तंबू अगदी खोल बर्फात गाडला गेल्याचे त्याला लक्षात येते. हा व्हिडिओ यू-ट्युबवर टाकण्यात आला असून आतापर्यंत तब्बल २२ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.