नालंदा जिल्ह्य़ातील एका शाळेच्या संचालकाला रविवारी सामूहिक हिंसाचारात जिवे मारण्यात आल्याच्या घटनेचे आज हिल्सा गावी हिंसक पडसाद उमटले. संतप्त जमावाने रस्ते अडवले, दुकाने बंद करण्यास भाग पाडले, तसेच जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या वाहनांसह अनेक वाहनांवर जोरदार दगडफेक केली.
निरपूर खेडय़ातील डीपीएस शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडल्यानंतर, स्थानिकांनी त्यासाठी शाळेचे संचालक देवेंद्र प्रसाद यांना जबाबदार ठरवून काठय़ांनी मारून त्यांचा जीव घेतला होता. त्यांचा मृतदेह सोमवारी सकाळी हिल्सा बाजार येथील त्यांच्या निवासस्थानी पोहचल्यानंतर निदर्शकांनी गावातील दुकाने बंद करण्यास भाग पाडले, तसेच हिल्सा- दानियावा मार्ग रोखून धरला. नालंदा जिल्ह्य़ाचे रहिवासी असलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी आपल्या मागण्या ऐकून घेण्यासाठी गावात यावे, अशी मागणी ते करत होते.
स्थानिक प्रशासनाने याबाबत माहिती दिल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी के. कार्तिकेय आणि पोलीस अधीक्षक सिद्धार्थ मोहन जैन यांनी हिल्सा बाजार येथे पोहचून निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु जमावाने त्यांच्या आश्वासनाकडे लक्ष दिले नाही. उलट त्यांनी या दोघांच्या वाहनांसह इतर काही वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या. त्यामुळे पोलिसांना जमावावर लाठीमार करणे भाग पडले.
दरम्यान, शाळा संचालकांवर हल्ला करून त्यांची हत्या करण्यास जबाबदार असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले. या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण पाहून आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपाखाली नालंदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील कुमार यांना निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
संचालकांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पाटणा क्षेत्राचे उपमहानिरीक्षक शालीन हे घटनास्थळी रवाना झाल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील कुमार यांनी पाटणा येथे सांगितले.