भाजप अध्यक्ष अमित शहा सध्या हरयाणाच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने भाजपकडून एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळांच्या बसेसचा वापर करण्यात आल्याने रोहतक जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. शाळांच्या बसेस भाजप कार्यकर्त्यांच्या ‘सेवेत’ दाखल झाल्याने विद्यार्थ्यांना शाळांकडून नाईलाजाने सुट्टी जाहीर करावी लागली. याबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

विशेष म्हणजे अमित शहांचे स्वागत करताना राज्यातील भाजप सरकारला नियमांचा विसर पडला. शाळांच्या बसेस राजकीय पक्षांच्या रॅलींसाठी केला जाऊ नये, असा नियम हरयाणा सरकारकडून काही महिन्यांपूर्वीच जारी करण्यात आला होता. राज्याचे अतिरिक्त सचिव राम निवास यांनी मार्च महिन्यात पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाला याबद्दलची माहिती शपथपत्रातून दिली होती. ‘शाळांच्या बसेसचा वापर राजकीय रॅलींसाठी केला जाऊ नये, असे आदेश सर्व संबंधित विभागांना देण्यात आले आहेत,’ असे राम निवास यांनी दोन्ही उच्च न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या शपथपत्रात नमूद केले होते. राजकीय रॅलींसाठी शाळांच्या बसेसचा वापर करणे मोटर वाहन कायदा, १९८८ चे उल्लंघन असल्याचे खुद्द हरयाणा सरकारच्यावतीने राम निवास यांनी शपथपत्रात म्हटले होते. मात्र अमित शहा यांचे स्वागत करताना हरयाणा सरकारला या सर्व नियमांचा विसर पडल्याचे चित्र दिसले. त्यामुळे अमित शहा यांच्या स्वागतासाठी सरकारने सर्व नियम धाब्यावर बसवल्याची चर्चा राज्यात आहे.

अमित शहा यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्रीच अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना सुट्टीची कल्पना देऊन ठेवली होती. यातील काही शाळांनी रॅलीच्या दिवशी वाहतूक कोंडी होईल, त्यामुळे सुट्टी जाहीर करत असल्याचे पालकांना सांगितले. तर काही शाळांनी जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या बसेस अमित शहांच्या रॅलीसाठी मागवण्यात आल्याने सुट्टी जाहीर करावी लागत असल्याचे पालकांना कळवले. ‘प्रशासनाकडून आमच्या बसेस रॅलीसाठी मागवण्यात आल्या. त्यामुळेच आमच्या शाळेसह इतरही अनेक शाळांनी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला,’ असे रोहतकमधील स्कॉलर्स रोसरी शाळेचे संचालक रवी गुगनानी यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले. रोहतकसोबतच शेजारील जिल्ह्यांमधील शाळांच्या बसेसचा वापरदेखील भाजप कार्यकर्त्यांसाठी करण्यात आला. त्यामुळेच या शाळांनादेखील सुट्टी जाहीर करावी लागली.