सगळी पृथ्वी जलप्रलयात नष्ट होणार असताना नोहाची नौका सर्र्वाना वाचवण्यासाठी बांधण्यात येते, ही गोष्ट तुम्ही पुस्तकात ‘नोहाची नौका’ म्हणून वाचली असेल, पण पृथ्वीवरील जीवन जलप्रलयानेच नष्ट होईल असे नाही. वैज्ञानिकांनी आता आंतरतारकीय नोहाचे यान तयार केले असून ते मानवांना घेऊन जगात जिथे कुठे वस्ती करणे शक्य असेल तिथे घेऊन जाऊ शकेल.
इंग्लंडमधील संशोधकांनी व त्यांच्या अमेरिकी, इटली, नेदरलँडसमधील सहकाऱ्यांनी पेरेसेफोन हा प्रकल्प तयार केला असून त्यात अंतराळयानात सूर्यमालेपलीकडे जाताना मानवाला तगून राहता येईल.
अंतराळयान हे शैवाल, कृत्रिम माती व सूर्याची उष्णता यांचा वापर करून जैवइंधन तयार करील तसेच अन्नाचे शाश्वत स्त्रोत तयार करील, असे ‘द टाइम्स’ने म्हटले आहे. यात काही हजार लोकांना काही पिढय़ा जिवंत ठेवता येऊ शकेल व त्यांना शेवटचा आशियाना सापडेपर्यंत त्यांची काळजी घेता येईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
या प्रकल्पाच्या संकेतस्थळानुसार प्रोटोसेल, प्रोग्रॅमेबल स्मार्ट केमिस्ट्री यांचा वापर अवकाशयानातील व्यवस्था तयार करताना केला जाईल. राशेल आर्मस्ट्रॉँग हे वास्तुविशारद व ग्रीनविच विद्यापीठाचे व्याख्याते असून एकूण १३ आरेखक काम करीत आहेत, त्यातील सहा ब्रिटनचे आहेत.
जैवअभियांत्रिकीतील कृत्रिम माती व पाण्याचे थेंब यांचे प्रोग्रॅमिंग करून सुविधा दिल्या जातील. जर पृथ्वी हवामान बदल, अणु दुर्घटना व जैविक युद्धतंत्र  यामुळे नष्ट झाली तर मानवी संस्कृती कशी वाचणार त्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत, असे वॉरविक विद्यापीठाचे समाजशास्त्रज्ञ स्टीव्ह फ्युलर यांनी सांगितले.
पृथ्वीवर शाश्वत शहरे तयार करण्यासाठीही या संशोधनाचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.