धूमकेतू म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो त्याचा पिसारा. पण पिसारा नसलेला धूमकेतू आता खगोल वैज्ञानिकांनी शोधला आहे. त्याच्या रचनेचा अभ्यास करून सौरमालेच्या निर्मितीविषयी काही प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
खूप कमी क्रियाशील असलेल्या या धूमकेतूचे नाव ‘सी/२०१४ एस ३’ (पॅनस्टार्स) असे असून तो सौरमालेच्या अंतर्गत भागातील द्रव्याचा बनलेला आहे. पृथ्वीची निर्मिती झाली होती त्या काळाच्या माहितीवर यामुळे प्रकाश पडू शकेल. हा धूमकेतू लंबाकार कक्षेचा असून त्याचा कक्षीय काळ ८६० वर्षे आहे. उर्टच्या ढगात तो तयार झाला असावा असा अंदाज आहे. सौरमालेच्या बाहेरच्या भागात जे बर्फाळ तुकडे आहेत त्याला उर्टचा ढग म्हटले जाते. हा धूमकेतू अलीकडेच सूर्याजवळ आला होता.
‘सी /२०१४ एस ३’ (पॅनस्टार्स) हा धूमकेतू लांब कक्षा असलेला पहिलाच आहे. त्याच्या अंतरंगात सौरमालेतील लघुग्रहांचे गुणधर्म असावेत असा अंदाज आहे. सौरमाला कशी तयार झाली यावर या धूमकेतूच्या अभ्यासातून प्रकाश पडणार आहे. या धूमकेतूत पृथ्वीसारखे ग्रह ज्याचे बनले आहेत ते द्रव्य असू शकते. आपल्याला अनेक लघुग्रह माहिती आहेत, पण ते सूर्याजवळ राहून अब्जावधी वर्षांत भाजले गेले आहेत, असे हवाई विद्यापीठाचे कॅरेन मीट यांनी सांगितले. हा धूमकेतू म्हणजे सूर्याच्या उष्णतेचा परिणाम नसलेला धूमकेतू म्हणता येईल, असे सांगून त्यांनी म्हटले आहे की, हा धूमकेतू वेगळा आहे हे लगेच आमच्या लक्षात आले होते. कारण त्याला शेपूट नाही व त्याचा कक्षीय काळही मोठा आहे.
सूर्याजवळ येताना या धूमकेतूचे चित्र वेगळेच दिसते. शेपटी नसलेल्या मांजरीला मॅंक्स म्हणतात, त्यामुळे या धूमकेतूला ‘मॅंक्स कॉमेट’ असे म्हटले जाते. या धूमकेतूच्या वर्णपंक्तीचा अभ्यास केला असता तो एस आकाराच्या लघुग्रहांचे गुणधर्म दाखवतो. लघुग्रह पट्टय़ाच्या अंतर्गत भागात असलेल्या लघुग्रहांप्रमाणे या धूमकेतूचे लघुग्रह आहेत. तो कमी क्रियाशील असून त्यात बर्फाची वाफ होत आहे व तो सूर्यापासून याच अंतरावर असलेल्या धूमकेतूंपेक्षा कमी क्रियाशील आहे. उर्टच्या ढगात जे द्रव्य असते तेच या धूमकेतूत असावे असा अंदाज आहे.
उर्टच्या ढगात तयार झालेले खगोलीय घटक ओळखण्याची काही प्रारूपे आहेत. त्यानुसार बर्फाळ व खडकाळ घटकांचा विचार त्यात केला जातो. हा धूमकेतू शेपटी नसलेला म्हणजे खडकाळ आहे व उर्टच्या ढगातून आलेला असा पहिलाच घटक आहे. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.