सूर्यमालेबाहेर पृथ्वीच्या आकाराचे एक, दोन नव्हे, तर तब्बल सात ग्रहांचा समूह असण्याचा दावा अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञांनी पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे या ग्रहांवर पाणी आणि त्यामुळे जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. या दाव्यामुळे खगोल शास्त्रातील संशोधनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. सौरमालेबाहेरील संशोधनालाही यामुळे गती मिळू शकते. या संदर्भातील एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सौरमालेबाहेर अशा पद्धतीने एकाचवेळी इतक्या ग्रहांचा समूह असण्याचा दावा पहिल्यांदाच करण्यात आला आहे. संशोधनातून पहिल्यांदाच ही घटना पुढे आली असल्याचे बेल्जियममधील लिग विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ मायकल गिलॉन यांनी सांगितले. सौरमालेपासून या नव्या ग्रहांच्या समूहाचे अंतर ४० प्रकाशवर्षे दूर असून, या ग्रहांची रचनाही पृथ्वीसारखीच असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आधी अशा पद्धतीने सौरमालेबाहेर पृथ्वी आणि भोवतीच्या ग्रहांसारखीच रचना असलेला ग्रहांचा समूह आढळून आला नव्हता.

ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या अमाऊरी ट्रायऑड यांनी म्हटले की, तिकडे पलीकडेही जीवसृष्टी असू शकते, या दाव्याच्या दिशेने अनेक वर्षांच्या संशोधनानंतर आम्ही महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या ग्रहांवरून होणारे वायूचे उत्सर्जन याचा अभ्यास केल्यानंतर या संदर्भात अधिक स्पष्टपणे बोलता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सात ग्रहांपैकी तीन ग्रहांवर पाण्याची स्रोत आढळून आले आहेत. या सहाही ग्रहांवरील तापमान अत्यंत थंड किंवा अत्यंत उष्ण नाही. त्यामुळे तिथे पाण्याचे अस्तित्व असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. सात पैकी पाच ग्रहांचा आकार अगदी पृथ्वी इतकाच आहे. तर उर्वरित दोन ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने लहान आहेत. आपल्या सौरमालेबाहेरही पृथ्वीसारखे ग्रह असू शकतात, या दाव्याला या नव्या शोधामुळे बळ मिळाले आहे. आपल्या सौरमालेतील मंगळ आणि शुक्र हे दोन्ही ग्रह पृथ्वीच्या आकाराचे आहेत. बुध हा आकाराने पृथ्वीपेक्षा लहान आहे. तर उर्वरित चार ग्रह आकाराने पृथ्वीहून मोठे आहेत. या नव्या संशोधनामुळे सौरमालेबाहेर पृथ्वीच्या आकाराचे सात ग्रह असण्याच्या दाव्याला पुष्टी मिळाली असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.