नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांचे प्रतिपादन

स्कॉर्पिन पाणबुडीबाबतची गोपनीय माहिती फुटल्याचे प्रकरण गंभीर आहे. मात्र, त्याबाबत फार चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही, असे नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी सोमवारी सांगितले.

स्कॉर्पिन पाणबुडीच्या तांत्रिक व इतर क्षमतांबाबतची माहिती फुटल्यानंतर नौदलप्रमुखांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. संरक्षणविषयक कोणतीही माहिती फुटते तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घेतली जाते. स्कॉर्पिनबाबत फुटलेल्या माहितीचा आढावा घेण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना फ्रान्सच्या डीसीएनएस या पाणबुडी निर्मात्या कंपनीला केली आहे, असे लांबा यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील पावले उचलण्यात येतील, असे नौदलप्रमुख लांबा म्हणाले.

स्कॉर्पिनबाबतची कोणती माहिती फुटली आणि त्यामुळे निर्माण होणारे धोके दूर करण्यासाठी समिती उपाय सूचवणार आहे. ही समिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे २० सप्टेंबपर्यंत अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. फ्रान्सच्या डीसीएनएस कंपनीच्या मदतीने नौदलासाठी मुंबईत सहा स्कॉर्पिन पाणबुडय़ांची निर्मिती केली जात आहे. या पाणबुडीबाबतची २२ हजार पानांची गोपनीय माहिती फुटली आहे.