भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक झाल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. फ्रान्समधील डीसीएनएस या पाणुबड्यांची बांधणी करणाऱ्या कंपनीची तब्बल २२,००० पानांची कागदपत्रे लीक झाल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या कागदपत्रांमध्ये भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांच्या ऑपरेटिंग मॅन्युअलच्या गोपनीय माहितीचा समावेश असल्याचे समजत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या माहितीमध्ये पाणबुड्यांचे सेन्सर्स, युद्ध व्यवस्थापन यंत्रणा, पाणतीर (टॉर्पेडो) प्रक्षेपण प्रणाली आणि पाणबुडीतील संपर्क व दिशादर्शन प्रणालीचा समावेश होता. ही माहिती पाकिस्तान किंवा चीनसारख्या देशांच्या हाती पडल्यास सागरी संरक्षणाच्यादृष्टीने भारतासाठी धोका उत्त्पन्न होऊ शकतो. लीक झालेल्या माहितीमध्ये पाणबुड्यांमधील युद्ध यंत्रणेचा तपशील असण्याची शक्यता आहे. याशिवाय, पाण्याखालून प्रवास करताना पाणबुड्यांच्या होणाऱ्या आवाजाचाही तपशील यामध्ये आहे. त्यामुळे शत्रूंना भारतीय पाणबुड्यांचा सहजपणे शोध लागण्याचा धोका आहे. भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन प्रकारातील पहिली पाणबुडी असणाऱ्या कलावरीची मे २०१६ मध्ये समुद्रात चाचणी घेण्यात आली असून ही पाणबुडी लवकरच नौदलात दाखल होणार आहे. याशिवाय, आगामी २० वर्षांत अशाच सहा स्कॉर्पिअन पाणबुड्या नौदलाच्या ताप्यात दाखल होणार आहेत.

 ‘आयएनएस कलावरी’ 

भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे.

* भारतीय नौदलासाठी सहा स्कॉर्पिअन पाणबुड्या तयार करण्याचे काम फ्रान्सच्या मेसर्स डीसीएनएसकडून सुरू आहे.  यासाठी डीसीएनएसकडून मेसर्स एमडीएल बरोबर तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करार करण्यात आला आहे. मुंबईजवळच्या माझगाव गोदीत या पाणबुड्यांच्या बांधणीचे काम सुरू असल्याचे समजते.

* भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन प्रकारातील पहिली पाणबुडी असणाऱ्या कलावरीची मे २०१६ मध्ये समुद्रात चाचणी घेण्यात आली असून ही पाणबुडी लवकरच नौदलात दाखल होणार आहे.

* युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे, पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे, पाणसुरुंग पेरण्याची ताकद, गुप्त माहिती गोळा करण्याच्या अत्याधुनिक सुविधांनी आयएनएस कलावरी ही पाणबुडी सुसज्ज आहे.

* आधुनिक युद्धयंत्रणा असणाऱ्या स्कॉर्पिअन पाणबुड्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून अचूक लक्ष्यभेदामुळे या पाणबुड्या काहीवेळातच शत्रूंना उद्ध्वस्त करू शकतात. या पाणबुड्यांमध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरून किंवा पाण्याखालून टॉर्पिडो मिसाईल (पाणतीर) आणि पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे.

* उष्ण कटिबंधासह सर्व प्रकारच्या वातावरणात स्कॉर्पिअन पाणबुड्या काम करू शकतात. नौदलांच्या अन्य पथकांशी संवाद साधण्यासाठी ही पाणबुडी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. या पाणबुड्या अत्याधुनिक पाणबुड्यांप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागावरून किंवा पाण्याखालून शत्रूवर हल्ला करू शकतात.

* स्कॉर्पिअन पाणबुडीत वेपन्स लाँचिंग ट्युबची (डब्ल्यूएलटी)  सुविधा असून त्यामुळे या पाणबुडीतून शस्त्रे नेता येऊ शकतात. तसेच पाणबुडीत शस्त्र हाताळणीसाठी असलेल्या विशेष सुविधांमुळे ही शस्त्रे सुमद्रात सहजपणे रिलोड करता येतात. या पाणबुडीवर बसवलेल्या शस्त्रे आणि जटील सेन्सर्स अत्युच्च दर्जाच्या युद्ध व्यवस्थापन यंत्रणेद्वारा नियंत्रित केली जातात.