‘स्कॉर्पिअन’ पाणबुड्यांबद्दलची लीक झालेली नवी माहिती ‘द ऑस्ट्रेलियन’ वृत्तपत्रांने जगासमोर आणली आहे. या पाणबुड्यांबद्दलची माहिती असणारी काही कागदपत्रे या वृत्तपत्राने बुधवारी आपल्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. दोन दिवसांपूर्वी ‘स्कॉर्पिअन’ या भारतीय नौदलासाठी बनवण्यात आलेल्या पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक झाली असल्याचा गौप्यस्फोट ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. फ्रान्सच्या डीसीएनएस या कंपनीला पाणबुड्या बनवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीकडील २२ हजार पानांची गोपनीय माहिती असलेली कागदपत्रे लीक झाली असल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन माध्यमांनी जगासमोर आणले.
‘द ऑस्ट्रेलियन’ वृत्तपत्रांने अपलोड केलेल्या कागदपत्रांत पाणबुड्यांबद्दलच्या युद्धसज्जतेची आणि सोनार यंत्रणेची माहिती आहे. ही माहिती वेबसाईटवर अपलोड केल्यानंतर नौदलाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. अपलोड करण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असून ती अनेक नौदलांच्या अधिकृत वेबसाईटवर असते अशीही माहिती नौदलाच्या सुत्रांनी दिली आहे. चोरी झालेली कागदपत्रे ही आताची नसून २०११ सालातली आहे अशीही माहिती प्रकरणात समोर आली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी चौकशीचे आदेश नौदलाला दिले होते. चोवीस तासांच्या चौकशीनंतर ही माहिती भारतून लीक झाली नसल्याची माहिती नौदलाने केंद्र सरकारला दिली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी फ्रान्स सरकारला केली असल्याचेही नौदलाने सांगितले.