वैज्ञानिक ज्ञान हे भारतीय भाषांमध्येही उपलब्ध आहे आणि संस्कृत ही भाषा सर्व भारतीयांना एका स्तरावर आणणारा घटक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी केले. ते मंगळवारी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी महेंद्र नाथ पांडे यांनी उपस्थितांना विद्यार्थ्यांच्या लष्करी शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. नालंदा विद्यापीठातील १० हजार विद्यार्थ्यांपैकी किमान दोन हजार विद्यार्थ्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतले असते तर ते बख्तियार खिलजीचा हल्ला परतवून लावू शकले, असते. शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा वारसा, पूर्वजांनी मिळवलेले यश आणि मूल्ये ही विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली गेली पाहिजेत, असे यावेळी महेंद्र नाथ पांडे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच संघाशी संलग्न असणाऱ्या शिक्षा संस्कृती उत्थान न्यास या संघटनेकडून नव्या शैक्षणिक धोरणासाठी मनुष्यबळ खात्याकडे काही सूचना पाठविण्यात आल्या होत्या. प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे. तसेच शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना भारतीय भाषांना पर्याय म्हणून विदेशी भाषांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येऊ नये, असा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रीय मनुष्यबळ खात्यापुढे ठेवला होता. यामध्ये भारतीय शिक्षणव्यवस्थेत कोणत्याही स्तरावर इंग्रजी भाषेची सक्ती केली जाऊ नये, असे म्हटले आहे. तसेच सर्वप्रकारचे संशोधन हे राष्ट्रहिताशी जोडले जावे. ही अट पूर्ण न करणाऱ्यांना विद्यापीठांकडून शिष्यवृत्ती दिली जाऊ नये. याशिवाय, भारतीय संस्कृती, परंपरा, पंथ, विचार आणि महापुरूषांचा अपमान करणाऱ्या आणि त्यांच्याविषयी गैरसमजुती पसरवणारा मजकूर सर्व स्तरावरील पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात यावा, असे संघप्रणित शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाच्या प्रस्तावात म्हटले आहे. यासाठी न्यासाच्या अध्यक्षांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेटही घेतली होती. दरम्यान, शैक्षणिक धोरण ठरवताना न्यासाच्या सूचनांचा विचार केला जाईल, अशी ग्वाही प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.