भाजपच्या नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त विधाने करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या होत्या. तसेच पक्षाच्या प्रवक्त्यांचे आणि प्रचारकांचे वक्तृत्वकौशल्य सुधारण्यासाठी यावेळी त्यांनी काही सूचनाही दिल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत नरेंद्र मोदींनी देशभरातील भाजपच्या तरूण कार्यकर्त्यांना घेऊन संसदेप्रमाणे वादविवाद सत्रांचे आयोजन करण्याची कल्पना मांडली होती. यामधून नव्या प्रवक्त्यांची निवड करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात यावे, असे मोदी यांनी सुचवल्याची माहिती भाजपमधील एका नेत्याने दिली.

याशिवाय, पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा सरकारचे यश आणि उपक्रमांबद्दल योग्य तो प्रचार न झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी पक्षाला प्रभावी लोकांची गरज असल्याचे मोदींना वाटते. या पार्श्वभूमीवर मोदींनी भाजप नेत्यांना देशभरात संसदेप्रमाणे वादविवाद सत्रे घेण्याचे आदेश दिले होते. या माध्यमातून सरकारची कामगिरी आणि धोरणे याबद्दलची भूमिका स्पष्टपणे मांडू शकणारे चेहरे निवडण्यावर मोदींचा भर आहे. तसेच या निवडक तरूणांना तज्ज्ञ व्यक्तींकडून प्रशिक्षण देण्याचाही मोदींचा मानस आहे. त्यामुळे मोदींच्या या सूचनेनुसार आता भाजपकडून जिल्हा आणि तालुका स्तरावर स्वत:ची भूमिका आणि कल्पना प्रभावीपणे मांडणाऱ्या तरूणांना निवडण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन केले जाईल.

दरम्यान, भुवनेश्वर येथे झालेल्या बैठकीत मोदींनी वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांना फैलावर घेतले होते. ध्वनिक्षेपक म्हणजे बोलण्यास भाग पाडणारे यंत्र नव्हे, असा टोला लगावत, भाजपनेत्यांनी शांत बसण्याची कला शिकून घ्यावी, असे मोदी म्हणाले. पक्ष सर्वत्र जिंकत असताना पक्षातील मंडळींमध्ये उत्साह संचारणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र त्या उत्साहाचे रूपांतर उन्मादामध्ये होता कामा नये, असेही त्यांनी बजावले होते.