सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या अडचणी वाढल्या असून मंगळवारी सेबीने रॉय यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. अॅम्बी व्हॅलीच्या लिलावात रॉय अडथळे आणत असल्याचा आरोप सेबीने केला आहे.

लोणावळा येथील बहुचर्चित, उच्चभ्रूंसाठीच्या सप्ततारांकित ‘अ‍ॅम्बी व्हॅली’चा लिलाव करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. लिलाव प्रक्रियेला सुरुवातदेखील झाली असून या प्रकल्पाची राखीव किंमत ३७, ३९२ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. मंगळवारी सेबीने सुप्रीम कोर्टात सुब्रतो रॉयविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली. काही दिवसांपूर्वीच अॅम्बी व्हॅलीला टाळे ठोकण्यात आले होते. अॅम्बी व्हॅलीच्या संचालक मंडळाला अॅम्बी व्हॅली चालवणे परवडत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. सध्या अॅम्बी व्हॅलीच्या सुरक्षेसाठी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. सहारा समुहाकडून लिलाव प्रक्रियेत अडथळे आणले जात आहेत, असे सेबीचे म्हणणे आहे. सहारा समुहाने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाही असा दावा सेबीने केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी याप्रकरणाची सुनावणी तीन सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाकडे याप्रकरणाची सुनावणी होईल. या याचिकेवर तात्काळ सुनावणी होणार असल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे व्याजासह परत करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. याप्रकरणात मार्च २०१४ मध्ये सुब्रतो रॉय यांना अटक झाली होती. सध्या ते पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहेत. लोणावळाजवळील ६७ हजार ६२१ एकर जागेवर अॅम्बी व्हॅली वसले आहे.