बांगलादेशात २७ वर्षांच्या तरुण ब्लॉगरची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन संशयित इस्लामी मूलतत्त्ववाद्यांपैकी दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ब्लॉगर असलेल्या अमेरिकी लेखक व ब्लॉगर अविजित रॉय यांची अशाच प्रकारे गेल्या महिन्यात ढाका येथे हत्या करण्यात आली होती.
सोमवारी सकाळी ढाका येथे भरदिवसा तेजगाव औद्योगिक वसाहतीत वाशीकुर रहमान मिशू याची कोयत्याने भोसकून हत्या करण्यात आली. ढाका वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मिशू यांना जखमी अवस्थेत आणण्यात आले होते, पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. तीन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यातील दोघांना घटनास्थळीच कोयत्यासह पकडण्यात आले, असे ढाक्याचे महानगर पोलीस आयुक्त विप्लब कुमार सरकार यांनी सांगितले.
या तरुण ब्लॉगरचे काही वैचारिक मतभेद होते, त्यामुळे त्याला ठार केले असावे असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्यांची नावे जिकूल व अरिफुल इस्लाम अशी आहेत. ते चितगाव येथील हथाझारी मदरसा व मिरपूरच्या दारूस उलुम मदरशाचे विद्यार्थी होते.
एका खासगी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मिशू हा एका स्वयंसेवी संस्थेत काम करीत होता व ब्लॉगिंग करीत होता. हत्या झालेला मिशू हा तिसरा ब्लॉगर आहे. इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी या हत्या केल्या आहेत. पहिली हत्या दोन वर्षांपूर्वी झाली होती, त्यात फेब्रुवारी २०१३ मध्ये ढाका येथे राजीब हैदर यांना ठार करण्यात आले होते.
बांगलादेशात ठार करण्यात आलेले ब्लॉगर
* राजीब हैदर
* अविजित रॉय
* वाशीकुर रहमान मिशू