पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला उत्तर देण्यासाठी आणि दहशतवादाचा बिमोड कऱण्यासाठी मंगळवारी भारतीय सैन्याने उचललेले पाऊल अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सप्टेंबर २०१६ मधील सर्जिकल स्ट्राईकनंतर सैन्याकडून कऱण्यात आलेली ही कारवाई दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.

सैन्याने पाकच्या चौक्या उदध्वस्त केल्याने तणावात भर पडण्याची शक्यता आहे. मात्र अशाप्रकारे कारवाई करुन भारतीय सैन्य सज्ज असल्याचे पाकला दाखवून देणे गरजेचे असल्याचे सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

१८ सप्टेंबर रोजी झालेल्या उरी हल्ल्याला भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या साह्याने उत्तर दिले होते. २९ सष्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला होता. यावेळी दहशतवाद्यांचे तळ उदध्वस्त करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय सैन्याकडून आज ही कारवाई करण्यात आली.

मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी २० आणि २१ मे रोजी नौशेरा भागात भारतीय सैन्याकडून कऱण्यात आलेली कारवाई महत्त्वाची आहे. पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने भारताने याविरोधात कठोर पावले उचलण्याची आवश्यकता होती. त्यामुळे भारताने आता उचललेले आक्रमक पाऊल अतिशय योग्य आहे, असे कर्नल वी. एन. थापर यांनी या कारवाईबाबत सांगताना स्पष्ट केले. यापुढच्या काळातही भारताला प्रोअॅक्टिव्ह राहून पाकिस्तानविरोधात पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानला लगाम घालण्यासाठी भारत निर्णायक पाऊल उचलू शकते असा इशारा दिला होता. तर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईकची आठवण ठेऊन कृती करावी, असा सज्जड दम दिला होता.