नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी टीकास्त्र सोडले. हे सरकार सत्तेवर आल्यापासून असहिष्णुता वाढली असून, जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये धोकादायकरीत्या वाढ झाल्याचा आरोप सोनियांनी केला.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना सोनियांनी मोदी सरकारवर चौफेर टीका करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नव्या आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन केले. सरकारच्या हुकूमशाही आणि जातीय प्रवृत्तीशी संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय काँग्रेसने जी तत्त्वे घालून दिली आहेत त्याला अनुसरून कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश आणि देशाच्या इतर भागांमध्ये जातीय दंग्यांच्या शेकडो घटना झाल्या, असा आरोप सोनियांनी केला.
जनतेच्या मनात काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण होत आहे. लोकसभेत जरी आपली कामगिरी खराब झाली असली तरी आमचे धैर्य कमी झालेले नाही. रस्त्यावर उतरून, घराघरात जाऊन कार्यकर्त्यांनी काम करावे, अशी सूचना केली. संसदेत विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्याचा संदर्भ घेत, संघर्षांसाठी केवळ संसद हेच एकमेव व्यासपीठ नाही. तर तळागाळात जाऊन जनतेशी संवाद साधावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाला संसदेतून सुरुवात – थरूर
नवी दिल्ली: काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली असल्याचा स्पष्ट संदेश पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीतून मिळत असून न्याय्य हक्कांसाठी आता पक्षाला उभे राहावे लागेल, असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे.पक्षाच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेची सुरुवात संसदेतून झाली आहे, असा संदेश आपल्याला पक्षाच्या सदस्यांना द्यावयाचा आहे. आपल्याला आता रस्त्यावर उतरून आम आदमीसाठी अधिक महत्त्वाची कामगिरी करावयाची आहे, असेही थरूर म्हणाले.काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय पक्षाची बैठक झाली.

काँग्रेसच सर्वात मोठा जातीयवादी पक्ष – जावडेकर
नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर भाजपने बुधवारी चांगलीच तोफ डागली. भाजप सत्तेवर आल्यानंतर देशातील जातीय हिंसाचारात वाढ झाली असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. सोनिया गांधी यांचा आरोप निराधार असून तो पक्षाच्या उद्विग्नतेतून करण्यात आला असल्याचे भाजपने म्हटले आहे.काँग्रेस पक्षाने पूर्णत: निराधार आरोप केले असून आम्ही त्याचे जोरदार खंडन करीत आहोत, काँग्रेसचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत.  काँग्रेस पक्षच जातीयवादी आहे आणि त्यांचा व्होट बँक कार्यक्रम आहे. काँग्रेसने हैदराबादमध्ये एआयएमआयएमशी, तर केरळमध्ये मुस्लीम लीगशी आघाडी केली आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.