लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर प्रथमच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यंदा पहिल्यांदाच ‘इफ्तार पार्टी’त सहभागी होताना दिसल्या मात्र, या इफ्तार पार्टीतील उपस्थितांच्या संख्येवरून लोकसभेतील पराभवाने पक्षात निर्माण झालेले राजकीय खटके आणि उदयोन्मुख राजकीय समीकरणांचे दर्शन झाले.
सोनिया गांधी, लालूप्रसाद यादव आणि शरद यादव एका टेबलावर दिसले. यातून बिहारमध्ये गेली जवळपास दोन दशके एकमेकांवर कुरघोडी करणारे काँग्रेस-राजद-जदयू हे तीन पक्ष लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या झटक्यानंतर राज्यस्तरावर भाजपला आळा घालण्यासाठी ‘हात’मिळवणी केल्याचे दिसले. तर, दुसऱया बाजूला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याबरोबर बसलेले होते. सोनिया मात्र त्यांना वारंवार त्यांच्यासोबत बसायला निमंत्रण देत असल्याचे दिसून आले.
तसेच कार्यक्रमात डाव्या पक्षांबरोबर काँग्रेसचा दुरावा वाढत असल्याचे दिसून आले. या पक्षांचा कोणताही नेता सोनियांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित नव्हता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या कार्यक्रमापासून दूरावा साधला त्यांच्या ऐवजी तारीक अन्वर कार्यक्रमात उपस्थित होते. इतकेच नव्हे, तर काँग्रेसचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. तसेच लोकसभेतील पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ अशा बड्या नेत्यांचीही अनुपस्थितीही थटकत होती.
पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी इफ्तार पार्टीत भरपूर आनंदी असल्याचे दिसून आले. ते पत्रकारांसोबत राजकारणाव्यतिरिक्त इतर विषयांवर गप्पा मारत होते. मात्र, राजकारणाविषयी कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.