सुरक्षा दलांनी यावर्षी १६ जुलैपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये १०४ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सरकारने मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना संसदेत याविषयी सांगितले.

दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सय्यद सलाउद्दीन याने भारतातील कोणत्याही भागावर हल्ला करण्याची आमची क्षमता असल्याचे म्हटले होते. त्यावर अहिर यांनी सुरक्षा संस्थांना याची माहिती असून ते कोणत्याही प्रकारचे आव्हान स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले.

जम्मू काश्मीरमधील काही ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिदीनने घेतल्याचे सांगताना ते म्हणाले, एनकाऊंटर झालेल्या घटनास्थळावरून मिळालेली काही हत्यारे आणि इतर वस्तू या विदेशातील असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर दहशतवादी संघटनांना पाकिस्तानकडून हत्यारे आणि मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, विविध सुरक्षा संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी जानेवारी ते दि. १६ जुलैपर्यंत १०४ दहशतवाद्यांना यमसदनास धाडले आहे. गेल्यावर्षी काश्मीर खोऱ्यात १५० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत (टेरर फंडिंग) केल्याप्रकरणी ८ फुटीरतावादी नेत्यांना अटक केली आहे. मनीलाँडरिंगचा आरोप या नेत्यांवर आहे. दोनच दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला होता. सुरक्षा दलाच्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला होता. सीमा रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे जम्मू- काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या चार जणांना अटक केली. हे चौघेही दहशतवादी संघटनेचे समर्थक होते. सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरु असतानाच घुसखोरीचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी माछिल सेक्टरमधील पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न सुरु असल्याचे सैन्याच्या जवानांच्या निदर्शनास आले. सैन्याने केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला.