दक्षिण काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर यासिन इटू उर्फ मेहमूद गझनवीला ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. गझनवीसह एकूण तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. यामुळे हिज्बुल मुजाहिद्दीनला मोठा धक्का बसला आहे. दुर्दैवाने दहशतवाद्यांशी दोन हात करताना लष्कराच्या दोन जवानांचा वीरमरण आले. शोपिया जिल्ह्यातील जैनापोरा भागातील अवनीरा गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाने जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मदतीने या भागात ऑपरेशन सुरु केले. यामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे.

शोपिया जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरक्षा दलाकडून ऑपरेशन सुरु होते. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच शोध मोहीम हाती घेण्यात आली. सुरक्षा दलांसह जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफकडून या भागात तपास सुरु असतानाच दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्कराचे पाच जवान जखमी झाले. यातील दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी आक्रमक होत दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला केला.

संपूर्ण रात्रभर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यानंतर सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी तिन्ही दहशतवाद्यांना घेरले आणि त्यांचा खात्मा केला. सुरक्षा दलांकडून कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहमूद गझनवीचा समावेश आहे. गझनवी गेल्या अनेक महिन्यांपासून काश्मीरमध्ये सक्रीय होता. मागील वर्षी हिज्बुलचा पोस्टरबॉय बुरहान वाणी सुरक्षा दलाच्या गोळीबारात मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यात गझनवीचा हात होता. जास्तीत जास्त तरुणांनी हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये प्रवेश करावा, याची जबाबदारी त्याच्यावर होती.