बियाणे व किटकनाशक उत्पादक कंपन्यांच्या परस्परातील भांडणामुळे  जनुकीय बदल करून विकसित केलेल्या बियाणांच्या चाचणीला विरोध होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खा. राजू शेट्टी यांनी केला आहे. या मुद्यावर शेट्टी यांनी केंद्र सरकारविरोधात भूमिका घेतली आहे.  संघ परिवारातील संघटनांच्या दबावापोटी जीएम सीड्सच्या चाचणीचा निर्णय  केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने रोखून धरला आहे. त्याविरोधात राजू शेट्टी यांनी सरकारवर  कठोर शब्दात कोरडे ओढले.  जीएम सीड्सची शेतात चाचणी करण्यास शेतकऱ्यांचा नव्हे तर पर्यावरणवादी किंवा विचारवंतांचा विरोध असल्याचा टोला खा. शेट्टी यांनी लगावला.
 जनुकीय बदल करून विकसित केलेल्या बियाणांच्या चाचणीशिवाय त्याचे दुष्परिणाम कसे समोर येतील, असा प्रश्न शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना उपस्थित केला.  या बियाणांचे दुष्परिणाम शोधण्याची जबाबदारी सामान्य व्यक्तीवर वा शेतकऱ्यावर सोपवू नका.  तज्ज्ञ, शास्त्रज्ञांनी शास्त्रीय पद्धतीने ही चाचणी करावी व त्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढण्यात यावा. संशोधन केल्याशिवाय विरोध करणे चुकीचे आहे. कृषिक्षेत्रात केवळ संशोधनानंतरच बदल होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे आयूध वापरू द्या, अशी आर्जव शेट्टी यांनी केंद्र सरकारला केली. या चाचणीला विरोध करणाऱ्यांच्या दोन लॉबी आहे. एक किटकनाशक उत्पादकांची तर दुसरी बियाणे उत्पादकांची. त्यांच्या लढाईत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. किटकनाशकांच्या उत्पादनावर किती केमिकल कंपन्या पोसल्या गेल्या, किटकनाशकाच्या वापरामुळे  किती जणांना कॅन्सर झाला याची माहिती  विरोध करण्याऱ्यांनी द्यावी, असे आव्हान शेट्टी यांनी दिले.
ते म्हणाले की,  भारतात मोठय़ा प्रमाणात अन्नधान्य तूटवडा आहे. वाढत्या लोकसंख्येची राज्यकर्त्यांकडून मूबलक व स्वस्त अन्नधान्य मिळावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी शेतमालाचा उत्पादन खर्च कमी करावा लागेल.  हायब्रीड बियाणांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती नाही. परिणामी किटकनाशके फवारावी लागतात. शेतकऱ्याचा सर्वाधिक खर्च किटकनाशकांवर होतो. त्यामुळे उत्पादनखर्च वाढतो.  शेतमाल घरात येण्यापूर्वी त्यावर सहा ते सात वेळा अत्यंत विषारी किटकनाशक फवारलेले असते. ते इतके विषारी असते की बऱ्याचदा त्याच्या वासानेदेखील मृत्यू येवू शकतो. विषारी किटकनाशकामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. किटकनाशक न फवारल्यास पीक येत नाही. कारण स्वदेशी वाणाच्या बियाणांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.  उत्पादनखर्च वाढल्याने शेतमाल महागतो.  मात्र जीएम सीड्समुळे शेतकरी व ग्राहक दोहोंचा फायदा होईल. कारण या बियाणांची रोगप्रतिकारक शक्ती विकसित केलेली असते, असा दावा शेट्टी यांनी केला.
अमेरिकेच्या वकिलातीकडून खा. राजू शेट्टी यांना अमेरिका दौऱ्यावर निमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेतील शेती, शेतीतील प्रयोग, विकसनशील कृषी तंत्रज्ञान, कृषी प्रदर्शन , शेतीतील नवनवीन प्रयोगांची माहिती या दौऱ्यात मिळेल, असे शेट्टी म्हणाले. शेट्टी यांच्यासह देशातील  कृषी क्षेत्रातील चार जाणकार खासदारांना अमेरिकन वकिलातीकडून संपर्क साधण्यात आला होता.