दिल्लीतील मधू विहार येथे राहत्या घरी मुलासह आत्महत्या करणारे उद्योग मंत्रालयाचे माजी महासंचालक बी के बन्सल यांनी आत्महत्येसाठी सीबीआयला जबाबदार ठरवले आहे. ‘सीबीआयच्या अधिका-यांनी माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा छळ केला असून यामुळेच आत्महत्येचे पाऊल उचलत आहे’ असा उल्लेख बन्सल यांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत केला आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी अटक झालेल्या बी के बन्सल आणि त्यांचा मुलगा योगेश या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनेही दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. १६ जुलै रोजी बन्सल यांना लाचखोरीप्रकरणी अटक झाली होती. त्यांना अटक झाल्याच्या तीन दिवसांनीच त्यांच्या पत्नी आणि मुलीने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता बन्सल पितापुत्रानेही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याच्या या घटनेने खळबळ माजली होती. तपासात बन्सल यांच्या घरात दोन सुसाईड नोट आढळल्या. यात बी के बन्सल यांनी लिहीलेली चार पानी आणि त्यांचा मुलगा योगेशने लिहीलेल्या सहा पानी सुसाईड नोटचा समावेश आहे. बी के बन्सल यांनी सुसाईड नोटमध्ये सीबीआयवर गंभीर आरोप केले आहे. सीबीआयच्या महासंचालकांनी मला धमकावले होते. तुझ्या पत्नीचे आणि मुलीचे असे हाल करु की ऐकणाराही थरथर कापले असे महासंचालकांनी म्हटले होते असे गंभीर आरोप बन्सल यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

‘लाचखोरीच्या प्रकरणात मी गुंतलो असीन तर कारवाई माझ्यावर झाली पाहिजे. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा छळ का करण्यात आला’ असा सवालही त्यांनी सुसाईड नोटद्वारे उपस्थित केला आहे.  बन्सल यांचा मुलगा योगेशनेही सुसाईड नोटमध्ये सीबीआयलाच जबाबदार ठरवले आहे. ‘माझ्या बहिणीने आणि आईने आत्महत्या केली नसून ती हत्याच होती’ असा आरोप योगेशने केला आहे. सोशल मीडियावर आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून बन्सल यांची सुसाईड नोट शेअर केली जात आहे. यामध्ये सीबीआयच्या महासंचालकांनी बन्सल यांना धमकावताना ‘मी भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा माणूस आहे. माझे कोणीही वाकडे करु शकत नाही’ असे म्हटल्याचा उल्लेख दिसतो. पण याविषयी सीबीआय किंवा पोलिसांनी या उल्लेखाला दुजोरा दिलेला नाही. बन्सल यांनी सुसाईड नोटमध्ये सीबीआयचे प्रमुख आणि अन्य पाच अधिका-यांना जबाबदार ठरवले आहे. सीबीआयने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. बन्सल आणि त्यांच्या मुलाच्या सुसाईड नोटमध्ये सीबीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. आम्ही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत असे सीबीआयच्या अधिका-यांनी सांगितले.