काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी हे राजकारणातील आपली नवी इनिंग सुरू करत आहेत. नव्वदी पार केलेले तिवारी आज आपल्या मुलाबरोबर भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. आपला मुलगा रोहितला राजकारणात सक्रिय करण्यासाठी तिवारी प्रयत्नरत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश सरकारने त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता. परंतु जोपर्यंत जनतेचा प्रतिनिधी म्हणून प्रस्थापित होत नाही. तोपर्यंत राजकारणातील आपली वीण घट्ट होत नाही यांची तिवारींना जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी मुलाला समाजवादी पक्षाकडून उत्तर प्रदेश विधानसभेसाठी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु यात यश येत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी उत्तराखंडमधून भाजपचे तिकिट मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला.

ते ज्या मतदारसंघातून उमेदवारी मागत आहेत. तेथून भाजपने आपला उमेदवार अद्याप घोषित केलेला नाही. त्यामुळेच तिवारी हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे. असं झाल्यास उत्तराखंडचे आतापर्यंतचे सर्व माजी मुख्यमंत्री हे भाजपकडे गेलेले दिसतील. डेहराडूनच्या चकराता, विकासनगर आणि धर्मपूर तसेच नैनितालमधील हल्दानी, भीमताल आणि रामनगर या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप झालेली नाही.
तिवारी हे तीन वेळा उत्तर प्रदेश व एकदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत. २००७ मध्ये ते आंध्र प्रदेशचे राज्यपालही होते. त्याचबरोबर ८० च्या दशकात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रीसहीत इतर महत्वाच्या पदावंर काम केलेले आहे. ते काँग्रेसचे सर्वाधिक जुने आणि अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. मध्यंतरीच्या काळात ते एका सेक्स रॅकेट प्रकरणातही अडकले होते. तसेच सध्या ज्या मुलासाठी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचे पितृत्वही त्यांनी सुरूवातीला नाकारले होते. डीएनए चाचणीत तेच पिता असल्याचे सिद्ध झाले होते.