तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्यानंतर पक्षाचे नेतृत्त्व त्यांच्या विश्वासू सहकारी व्ही. के. शशिकला यांच्याकडे सोपवण्यात यावे, असा आग्रह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धरला आहे. पक्षानेच ही माहिती आज, शनिवारी दिली. दरम्यान, जयललिता यांच्या निधनानंतर लवकरच पक्षातील उच्चपद असलेल्या महासचिवपदासाठी नावाची घोषणा करण्यात येणार आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे भवितव्य काय, पक्षांतर्गत वाद होतील का, जयललिता यांच्या विश्वासू शशिकला यांच्याकडे पक्षाची सूत्रे जाणार का, असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. एम. जी. रामचंद्रन किंवा जयललिता यांच्या धर्तीवर जनमानसावर छाप पाडेल असे नेतृत्व पक्षाकडे नाही. तसेच गटबाजी वाढत गेल्यास अण्णाद्रमुकचे भवितव्य कठीण असल्याचे मानले जाते. असे असताना आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जयललिता यांच्या सहकारी शशिकला यांच्याकडे पक्षाचे नेतृत्त्व सोपवले जावे, असा आग्रह धरला आहे. पक्षानेही वरिष्ठांनी केलेल्या आग्रहाचे जोरदार समर्थन केले आहे, असे समजते. शशिकला यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात काहीच गैर नाही. त्या पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

शशिकला यांची राज्याचे मंत्री भेट घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेबाबत उत्तर देताना प्रवक्ता सी. पोन्नाईयान यांनी शशिकला यांच्या नावाला अप्रत्यक्ष पाठिंबाच दिला. पक्षातील कोणी शशिकला यांची भेट घेत असल्यास त्यात गैर काय आहे. त्या पक्षाच्या प्रमुख नेत्या नाहीत का? तुम्ही जे बोलत आहात, ते चुकीचे आहे, असे ते म्हणाले. अण्णाद्रमुकच्या नेतृत्त्वाखालील सरकार आणि पक्ष संघटनेतील दुराव्याबाबत विचारले असता, सरकारचे नेतृत्त्व पन्नीरसेल्व्हम करत आहेत. तर दुसरीकडे पक्षातील नवनिर्वाचित पदाधिकारी पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळत आहेत, असे सांगून चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विविध पातळ्यांवर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष पुढे जात आहे आणि शशिकला या पक्षातील महत्त्वाच्या नेत्या आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शशिकला या पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्यासोबत अखेरच्या श्वासापर्यंत राहिल्या. अशा वेळी असे प्रश्न उपस्थित करणे गैर आहे. पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीची लवकरच महासचिव म्हणून निवड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.