राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानीचा जावई अल्ताफ अहमद शाह याला ताब्यात घेतलं आहे. दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवणे आणि काश्मीरमध्ये हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून एनआयएने ही कारवाई केली आहे. गिलानीच्या जावयासह अन्य दोन फुटीरतावादी नेत्यांनाही ताब्यात घेतले आहे. अयाज अकबर आणि मेहराजुद्दीन कलवल अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

गिलानीचा जावई अल्ताफ अहमद शाह याला अल्ताफ फंटूश या टोपण नावानेही ओळखले जाते. एनआयएने त्याची १२ जून रोजीही तब्बल सहा तास चौकशी केली होती. अल्ताफची मालमत्ता आणि उत्पन्नाच्या स्रोतासंबंधी एनआयएने ही चौकशी केली होती. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी कथितरित्या पैसा पुरवल्याचा संशय असल्यानं एनआयएने अल्ताफची चौकशी केली होती. गिलानी याच्या नेतृत्वाखालील तेहरीक ए हुर्रियतच्या कथित फंडिंगप्रकरणी अल्ताफची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान एनआयएने केलेल्या या कारवाईवर गिलानीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एजन्सीनं कारवाई करताना सीमेचं उल्लंघन केलेले आहे. ही कारवाई कायद्याच्या अधीन राहून केलेली नाही, असे गिलानीने म्हटले आहे. याआधी ईडीने काश्मीर खोऱ्यात अशांतता फैलावण्यासाठी सीमेपलिकडून पैसा मिळत असल्याच्या प्रकरणात लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईद, दुख्तरान ए मिल्लत, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि हुर्रियत कॉन्फरन्सच्या सदस्यांविरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. तसंच ईडीने काही फुटीरतावादी नेत्यांची प्राथमिक चौकशीही केली होती.