जम्मू काश्मीरमधल्या गुलमर्गमध्ये रविवारी केबल कारचा टॉवर पडल्याने ७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार ही माहिती समोर आली आहे. गुलमर्गमधली केबल कार हा पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतो. उन्हाळ्याच्या दिवसात या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असतात. गुलमर्गमधले हिवाळी खेळही प्रसिद्ध आहेत. जगभरातून त्यासाठी लोक गुलमर्गला येत असतात. आज मात्र प्रसिद्ध असलेल्या केबल कारचा टॉवर पडल्याने ७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. तर अनेक लोक जखमीही झाले आहेत.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केबल कारचा टॉवर ढासळला. तसेच केबल कारची तारही तुटली. ज्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते आहे. जयंत अंद्रासकर, मानसी अंद्रासकर, त्यांच्या दोन मुली अनघा आणि जान्हवी तसेच गाईड मुख्तार अहमद या सगळ्यांचा या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. इतर दोन मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अंद्रासकर कुटुंब हे दिल्लीमध्ये वास्तव्य करणारे होते. सुरूवातीला ही घटना समोर आली तेव्हा पाच लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. आता मात्र ही संख्या ७ वर गेली आहे. घटना घडल्यावर तातडीने मदत आणि बचाव कार्य मोहीम राबवण्यात आली. जखमी झालेल्या पर्यटकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.