आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काश्मीरमधील फुटिरतावादी नेता शब्बीर शहा याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रानुसार, दहशतवादी हाफिज सईद याच्याशी फोनवरुन काश्मीर प्रश्नावर चर्चा केली होती, अशी कबुली शहाने दिली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्यात संभाषण झाले होते.


दिल्ली येथे आपण शब्बीरच्या वतीने अनेकदा हवाला व्यवहाराचे पैसे स्वीकारल्याची कबुली नुकतीच अस्लम वानी याने दिली होती. शब्बीरला हे पैसे पाकिस्तानातील हवाला ऑपरेटर शफी शायर देत होता. जम्मू-काश्मीर आणि देशातील इतर भागांत दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी शब्बीर शहाला पाकिस्तानातील दहशतवादी गटांकडून पैशाचा पुरवठा होत होता, असे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.


दरम्यान, माझ्याकडे मिळकतीचे कुठलेही स्त्रोत नाहीत. त्यामुळे मी इन्कम टॅक्स रिटर्न भरत नसल्याचे शब्बीरने म्हटले आहे. स्थानिक नागरिक आणि हितचिंतक पक्षनिधी म्हणून शब्बीरला पैसा देत होते, यातून त्याला वर्षाकाठी ८ ते १० लाख रुपये मिळत असल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर शब्बीरची पत्नी डॉ. बिल्किस हिचाही ‘टेरर फंडिंग’ प्रकरणात हात असल्याचे ईडीने म्हटले आहे.