जामीन आदेशाविरुद्धची याचिका

राष्ट्रीय जनता दलाचा वादग्रस्त नेता शहाबुद्दीन याच्यावर जे खटले सुरू आहेत त्यातील साक्षीदारांना ‘संपवण्यात आले आहे’, असे सांगून आपण खून प्रकरणात ‘मीडिया ट्रायल’ला सामोरे जात असल्याचा दावा, तसेच आपल्याला स्वसंरक्षणासाठी बाजू मांडण्यास आणखी वेळ मिळावा ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.

शहाबुद्दीनच्या दाव्याचा फारसा परिणाम होऊ न देता, तुमचा जामीन रद्द का करण्यात येऊ नये याचे समर्थन करण्यासाठी येत्या बुधवारी तयार राहावे, असे न्यायालयाने त्याला सांगितले. या प्रकरणात आरोप- प्रत्यारोप केले जात असल्याने आम्ही सुनावणी आणखी लांबणीवर टाकण्यास अनुकूल नाही. आधीच अनेक साक्षीदारांना संपवण्यात आले आहे, असे न्या. पी. सी. घोष व न्या. अमितावा रॉय यांनी सांगितले.

या प्रकरणातील भलामोठा रेकॉर्ड व याचिकेचा मजकूर तपासून पाहण्यासाठी आपल्याला एक आठवडय़ाचा वेळ हवा असल्याचे शहाबुद्दीनची बाजू मांडणार असलेले ज्येष्ठ वकील राम जेठमलानी म्हणाले.

मात्र ही व्यक्ती उर्वरित साक्षीदारांसाठी धोका आहे असे सांगून याचिकाकर्ते चंद्रकेश्वर प्रसाद यांच्या वतीने युक्तिवाद करणारे वकील प्रशांत भूषण यांनी त्यास विरोध केला. तो मान्य करून खंडपीठाने सुनावणी २८ सप्टेंबपर्यंत पुढे ढकलली. प्रसाद यांची तीन मुले दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मारली गेली आहेत.

शहाबुद्दीनतर्फे युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील शेखर नाफडे यांनी या म्हणण्याचे जोरदार खंडन केले. आपल्या अशिलाला ‘मीडिया ट्रायल’ला तोंड द्यावे लागत असून भूषण यांच्यासारखे वकील हे सार्वजनिक नैतिकतेचे एकमेव रक्षणकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भूषण यांनी या संदर्भात समाजमाध्यमांवर केलेली वक्तव्ये अतिशय धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.

बिहार सरकारनेही भूषण यांच्या युक्तिवादाचे समर्थन केले. या खून खटल्यात आता आणखी एकच साक्षीदार असून त्यांना (चंद्रकेश्वर प्रसाद) काही झाले तर दोन्ही खटले कोलमडून पडतील, असे राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितले.