पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी गेल्या काही दिवसांपासून निदर्शकांकडून सुरू असली, तरी शरीफ यांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिला आहे. देश यापूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीतून तरला आहे, त्यामुळे विद्यमान राजकीय परिस्थितीही लवकरच निवळेल, असा विश्वास शरीफ यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा तहरिक-ए-इन्साफ पक्ष आणि धर्मगुरू कादरी यांच्या पाकिस्तान अवामी तहरिक पक्षाच्या वतीने गेल्या दोन आठवडय़ांपासून शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली आहे. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप कादरी आणि इम्रान खान यांनी केला आहे.पाकिस्तानवर यापूर्वीही अनेकदा अत्यंत बिकट परिस्थती ओढवली होती, २००८ च्या निवडणुकीत आमचे हात बांधलेले होते, तरीही आम्ही प्रचार करून निवडणुकीत सहभागी झालो होतो, तेव्हा आम्ही गैरप्रकारांबद्दल गळा काढला नाही. तेव्हा हुकुमशहाचे सरकारवर नियंत्रण होते. ‘पीपीपी’ला आमच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आम्ही त्यांचा अधिकार मान्य करू, असे शरीफ म्हणाले. मात्र सध्याची स्थिती लवकरच निवळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.