भारतीय तिरंग्याची पाय पुसणी विक्रीस ठेवल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागलेल्या ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर आता केंद्रातील आर्थिक प्रकरणाचे सचिव शक्तिकांत दास यांनी निशाणा साधला आहे. रविवारी (दि. १५) सांयकाळी सलग तीन ट्विट करून त्यांनी अॅमेझॉनला इशारा दिला आहे. ‘अॅमेझॉन चांगला व्यवहार करा. भारतीय प्रतिके आणि आदर्शांना कमी लेखण्यापासून स्वत:चा बचाव करा. बेजबाबदारपणाची जोखीम तुमची स्वत:ची असेल.’ त्यानंतर त्यांनी पुन्हा एक ट्विट केले. ते म्हणाले, अॅमेझॉनबाबतचे हे वक्तव्य एक मी भारतीय नागरिकाच्या रूपाने केलेले आहे. याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये.’ आपल्या तिसऱ्या आणि अखेरच्या ट्विटमध्ये ते म्हणतात,’ आर्थिक सुधारणा, व्यापारात सुलभपणा आणि खुल्या व्यवसायासाठी आपण कटिबद्ध आहोत. परंतु जेव्हा आमच्या आदर्शांना लक्ष्य केले जाते. तेव्हा मी भावूक होतो.’, असे त्यांनी म्हटले. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनकडून (कॅनडा) भारतीय तिरंगा असलेल्या पाय पुसणीच्या विक्रीवर आक्षेप नोंदवला होता.

१९८०च्या तामिळनाडू केडरचे आयएएस अधिकारी असलेले शक्तिकांत दास हे फेब्रुवारी महिन्यात निवृत्त होणार आहेत. सेबीच्या पुढील अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. गतवर्षी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर निवड प्रक्रियेतही त्यांच्या नावाची चर्चा होती. नॅसकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर म्हणाले, सुषमा स्वराज आणि दास यांचे कोणतेही वक्तव्य हे एखाद्या कंपनीविरोधात असल्याकडे पाहू नये. ते इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले, माझ्या मते एखाद्या कंपनीला लक्ष्य बनवण्याचा हा उद्देश नाही. कोणाचेही या मुद्द्यावर वेगळे मत असू शकते. परंतु याचा विदेशी गुंतवणकीवर परिणाम होईल, असे मला वाटत नाही. तो एक विचार होता आणि ते व्यक्तही करण्यात आले आहे. कोणताही कायदेशीर आदेश नव्हता. मला असं वाटतं की आपण खूप विचार करतो. परंतु जेव्हा सरकारच्या वतीने काही केलं जातं. तेव्हा हे प्रकरण बिल्कूल वेगळे असते. तेव्हा ती गोष्ट वैयक्तिक राहत नाही.
अॅमेझॉन डॉट कॉम आणि अॅमेझॉन इंडियाला या प्रकरणी खुलासा मागितला होता. परंतु त्यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नाही. गेल्या आठवड्यात एका ट्विटर युजरने सुषमा स्वराज यांना अॅमेझॉन कॅनडाच्या साइटवर तिरंग्याचे छायाचित्र असलेल्या पायपुसणी विकण्यात येत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी हे उत्पादन मागे घ्यावे आणि विनाअट माफी मागण्यास सांगितले होते. तसेच माफी न मागितल्यास अॅमेझॉनच्या अधिकाऱ्याला भारताचा व्हिसा नाकारण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर अॅमेझॉनने कॅनडा पोर्टलवरून आपले उत्पादन मागे घेतले होते. अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक अमित अग्रवाल यांनी याबाबत खेद व्यक्त केला होता.