आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. छत्तीसगढमधील सिवानी जिल्ह्यातील पाटन गावात एका मुलाने आपल्या वयस्कर आईचा निर्दयीपणे खून केल्याची घटना घडली आहे. जेवण मागणा-या वृद्ध आईचा मुलाने कु-हाडीने खून केल्याचे समोर आले आहे. सदर घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.
पाटन गावात राहणा-या रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आई व मुलामध्ये जेवणावरून काही वाद झाला होता. त्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या मुलाने कु-हाडीने आपल्या वृद्ध आईचा गळा कापून त्यास शरीरापासून वेगळे केले. यामुळे सदर वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा आरोपीची पत्नी आणि मुलगी मजदुरी करण्यासाठी शेतावर गेल्या होत्या. शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्या म्हणजेच सुनिया बाई यांची किंकाळी ऐकू येताच शेजारी आणि ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आरोपीवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. लखनादौन न्यायालयाने आरोपीची तुरुंगात पाठवणी केली आहे. केवळ अन्नासाठी जीव गमवावा लागलेल्या सुनिया बाई यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव नातेवाईकांना देण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.