देशात बलात्काराच्या घटनांमध्ये होत असलेल्या वाढीला पाश्चिमात्यांचा दिवसेंदिवस आपल्यावर वाढत चाललेला पगडा हे मुख्य कारण असल्याचे मत पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
चित्रपट, क्लब संस्कृती आणि अमली पदार्थ या पाश्चिमात्यांच्या अनुकरणांमुळे देशाची युगानुयुगांपासून चालत आलेली मूल्ये आणि तत्त्वे यांचा ऱ्हास झाला आहे. त्यामध्ये बदल होण्याची गरज आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपली संस्कृती आणि मूल्ये यांचे जतन करण्यास आपण समर्थ होतो. मात्र गेल्या ६५ वर्षांत आपल्यातील ही संस्कृती हरवली आहे, असेही निश्चलानंद म्हणाले.
दिल्ली सामूहिक बलात्काराचा प्रकार अचानक घडलेला नाही. विकास आणि नागरीकरण यांच्या नावाखाली संस्कृती आणि मूल्ये यामधील पुसटशी किनार ओलांडली गेली आहे. त्यामुळे याचा गंभीरपणे विचार करून भविष्यात या घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
यापूर्वी सर्व बंधू आणि भगिनी निर्भयपणे फिरत होत्या, तेव्हा काहीही घडले नाही. मात्र आता मानवी मूल्यांची, भावनांची घसरण होत चालली आहे. महिलांचा आदर करणे ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे.
पाकिस्तानात दोघा भारतीय जवानांची हत्या करण्यात आली. ते कृत्य अमानुष आणि मानवी मूल्यांच्या विरोधातील आहे, असेही ते म्हणाले.