बिहारमध्ये ‘राजद’ची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी करण्याच्या नितीश कुमार यांच्या निर्णयावर गेल्या अनेक दिवसांपासून चुप्पी साधून असणाऱ्या शरद यादव यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. त्यांनी सोमवारी संसदेच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद यादव यांनी म्हटले की, बिहारमध्ये घडलेला प्रकार हा दुर्दैवी असून त्यामुळे जनमताचा अनादर झाला आहे. नितीश कुमार यांनी जो निर्णय घेतला त्याच्याशी मी सहमत नाही. हे खूपच दुर्दैवी आहे. बिहारच्या जनतेने यासाठी आम्हाला सत्ता दिली नव्हती, असे यादव यांनी म्हटले.

महाआघाडीला धोबीपछाड देऊन भाजपबरोबर एका रात्रीत हातमिळवणी करण्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांचा निर्णय त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्या पचनी पडला नसल्याचे सुरूवातीपासूनच दिसत होते. तर दुसरीकडे पक्षाचे राज्यसभा खासदार अन्वर अलींनी तर उघडपणे या निर्णयास विरोध केला होता. पक्षाच्या अकरा यादव व सात मुस्लीम आमदारांमधूनही विरोधाचे सूर बाहेर पडत असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतरही नितीश कुमार सरकारने बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. त्यानंतरही शरद यादव यांनी नितीश यांच्या निर्णयाबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे शरद यादव नितीश यांच्यावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती.

शरद यादवांनी फोन करून मला पाठिंबा दिला; लालूप्रसाद यांचा दावा

आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव यांनी शरद यादव यांचा मला पाठिंबा असल्याचा दावा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. नितीशकुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शरद यादव यांचा मला फोन आला. मी तुमच्यासोबत आहे, असे त्यांनी मला फोनवरून सांगितल्याचा दावा लालूप्रसाद यांनी केला होता. त्यांच्या नाराजीबाबत येथील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. तसेच यादव गेल्या काही महिन्यांपासून संसदेतही फारसे कुणाशी बोलत नसल्याचे सांगण्यात येत आहे. नितीशकुमार यांनी महाआघाडीची फारकत घेत एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी शरद यादव एका कार्यक्रमासाठी आले होते. नितीशकुमार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर ते लगेच तेथून निघून गेले होते.