काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आलाय, विषम तारखेस केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री बनणार, सम तारखेस पंजाबचे तर सुटीच्या काळात गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी निभावणार आहेत, असे ट्विट त्यांनी केले आहे. थरूर यांच्या या ट्विटसचे लोकांनी समर्थन करताना केजरीवाल यांची खिल्ली ही उडवली आहे. एकाने म्हटले, तुम्ही योग्य निशाणा साधला आहे. आज सम तारीख आहे. तर दुसरा म्हणतो, अरविंद केजरीवाल राजकारणातील अक्षय कुमार आहेत. ते एकाचवेळी तीन राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत.

परंतु, काहींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. जर राहुल गांधी यांना पदावरून हटवले तर मी काँग्रेसची पूजा करेन असे एकाने म्हटले तर एकाने काँग्रेस नेत्यांच्या ट्विटर हँडलवरून एक सारखेच ट्विट कसे होतात अशी शंका उपस्थित केली आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांचा समावेश आहे. यातील पंजाब आणि गोवा राज्यात आम आदमी पक्ष निवडणूक लढवणार आहे. केजरीवाल हेच पंजाबचे मुख्यमंत्री पदासाठी उभे आहेत असे समजून पंजाबच्या लोकांनी मतदान करावे, असे आवाहन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पंजाब येथील प्रचारसभेत केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मोदा वाद झाला होता. नेत्यांसह सामान्य लोकांनीही केजरीवाल दिल्लीच्या लोकांना धोका देऊन पंजाबला जात आहेत अशी चर्चा सुरू आहे. नंतर केजरीवाल यांनी खुलासा करत दिल्ली सोडून आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.