प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नोटीस बजावली. माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना भाषणबाजीला आवर घाला असे सांगत फटकारले. तुम्ही एखादी बातमी देऊ शकता, त्याच्याविषयी तथ्य मांडू शकता. मात्र, तुम्ही थेट एखाद्याचे नाव घेऊ शकत नाही. हे योग्य नाही, अशा शब्दात न्यायालयाने अर्णब यांना फटकारले. न्यायालयाने अर्णब गोस्वामींना या नोटीसला उत्तर देण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

रिपब्लिकन वृत्तवाहिनीकडून शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्यासंदर्भात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. यामध्ये दर्शकांच्या भावना चिथावण्याचा आणि निराधार वृत्तांकन केल्यामुळे आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप शशी थरूर यांनी केला होता. त्यानंतर शशी थरूर यांच्याकडून शुक्रवारी अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिकन टीव्ही वृत्तवाहिनीविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला होता. यावेळी त्यांनी २ कोटी  रूपयांच्या नुकसान भरपाईची मागणीही केली होती.

यापूर्वी ‘टाईम्स नाऊ’ वाहिनीतील मजकूर चोरल्याच्या आरोपावरून न्यायालयाने त्यांना अर्णब यांना नोटीस बजावली होती. कर्मचारी कराराचे उल्लंघन आणि टाईम्स नाऊच्या बौद्धीक संपदेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले.अर्णब यांनी गेल्या वर्षी ‘टाईम्स नाऊ’च्या मुख्य संपादकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मे महिन्याच्या सुरुवातीलाच ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी सुरू केली आहे. या नव्याने सुरु करण्यात आलेल्या वाहिनीत त्यांनी टाईम्स नाऊमधील काही रेकॉर्डींगचा वापर केल्याचा ‘टाईम्स नाऊ’चा आरोप आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव हे तुरूंगात असलेल्या शहाबुद्दीनशी चर्चा करत असल्याचा दावा रिपब्लिकन टीव्हीने ऑडिओ टेपच्या माध्यमातून केला होता. तर दुसरीकडे सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूवरही एक ऑडिओ टेप असल्याचा दावा केला होता. यामध्ये रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकार प्रेमा श्रीदेवी या सुनंदा पुष्कर यांच्याशी बोलत असल्याचे ऐकायला मिळते. ज्यावेळी ही चर्चा झाली, त्यावेळी प्रेमा श्रीदेवी या टाइम्स समूहाच्या पत्रकार होत्या. या दोन ऑडिओ टेपमुळे टाइम्स नाऊची प्रमुख कंपनी ‘बीसीसीएल’ने अर्णब यांच्यावर मजकूर चोरीचा आरोप केला होता.

बीसीसीएलने मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात अर्णब आणि प्रेमा श्रीदेवी यांच्याविरोधात स्वामित्त्व हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती. अर्णब आणि श्रीदेवी यांनी टाइम्स नाऊ वाहिनीच्या मालमत्तेचा गैरवापर केल्याचे बीसीसीएलने आपल्या तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना नोटीस बजावण्यात आली असून याप्रकरणी कोर्टाने खुलासा मागितला आहे. याशिवाय टाईम्स समूहाने अर्णब गोस्वामी यांना ‘नेशन वॉन्ट्स टू नो’, ही टॅगलाईन वापरु नये, यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली होती. अर्णब यांनी त्यांच्या नव्या वृत्तवाहिनीवर नेशन वॉन्ट्स टू नो, ही टॅगलाईन वापरु नये, असेही टाईम्स समूहाने आपल्या नोटिशीत म्हटले होते.