‘नरेंद्र मोदी हे निर्भय असल्याचे लोक सांगतात. आम्हाला न्याय मिळवून देण्यात ते मदत करतील काय?’, असा प्रश्न दोन वर्षांपूर्वी नवी दिल्लीतील सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीच्या वडिलांनी विचारला आहे.
अलीकडे उबेर कंपनीच्या टॅक्सीचालकाने एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या घटनेच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, १६ डिसेंबर २०१२ पासून भारतात या संदर्भातील परिस्थिती काहीच बदललेली नाही. आमचे नेते आणि मंत्री यांनी केलेली वक्तव्ये पोकळ ठरली आहेत. आम्हाला जे भोगावे लागते, त्यामुळे त्यांना काही काळ प्रकाशात येण्याची संधी मिळते.
‘मला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही काय केलेत?’, असा प्रश्न माझी मुलगी मला विचारते. तिच्यासारख्या अनेक मुलींना न्याय मिळावा यासाठी मी काय करतो, असे ती विचारते, तेव्हा मी किती असहाय आणि क्षुद्र आहे याची मला जाणीव होते. ‘त्या’ दुर्दैवी रात्रीनंतर मी शांतपणे झोपलेलो नाही असे ते म्हणाले.
एका अल्पवयीन मुलासह सहाजणांनी फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षांच्या या तरुणीवर १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत एका धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून नंतर तिला आणि तिच्या मित्राला बसबाहेर फेकून दिले होते. यात गंभीर जखमी झालेली ही युवती २९ डिसेंबरला सिंगापूर येथील रुग्णालयात मरण पावली. सहापैकी एक आरोपी नंतर तिहार तुरुंगात मरण पावला.
या बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्य़ातील अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश या चार आरोपींवर खटला चालवून जलदगती न्यायालयाने १३ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या वर्षी मार्चमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. त्यावर आरोपींनी केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची या मुलीचे कुटुंब वाट पाहात आहे.
आमच्या मुलीच्या बलात्कार आणि खुनासाठी शिक्षा सुनावण्यात आलेल्या चार आरोपींच्या शिक्षेची अजून अंमलबजावणी झाली नसेल, तर परिस्थितीत कसा काय बदल होईल? सगळे पुरावे मिळालेले असताना त्या बलात्कारी व खुन्यांना फाशीवर लटकवण्यापासून अधिकाऱ्यांना कुठली गोष्ट रोखत आहे, असे मुलीच्या वडिलांनी निराशेने विचारले. नव्या सरकारकडून न्यायाची आशा बाळगणाऱ्या तरुणीच्या पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.