पंजाबमध्ये मोगा येथे बादल कुटुंबीयांच्या ऑर्बिट बस कंपनीच्या बसमध्ये विनयभंगाच्या प्रयत्नानंतर बाहेर फेकल्याने मरण पावलेली १३ वर्षांची मुलगी पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होती व तिला वंचितांचे व दडपलेल्यांच्या हक्कांसाठी लढण्याची इच्छा होती, असे तिच्या मित्र व कुटुंबीयांनी सांगितले.
तिचा चुलतभाऊ संदीप सिंह व तिची मैत्रीण सोमाराणी यांनी मोगा येथे सांगितले की, सदर मुलगी हुशार होती व तिला पोलीस दलात काम करायचे होते. वंचित व गरजूंसाठी काम करण्याची तिची इच्छा होती, तिला पोलीस अधिकारी व्हायचे होते. वंचितांना न्याय देण्यासाठी लढा द्यायचा होता.
‘आरोग्याबाबत तसेच कपडय़ांबाबत ती जागरूक होती, आमचे आईवडील आमच्यासाठी ज्या वस्तू घेत त्या आम्ही एकमेकींना देत असू. तिला छान कपडे परिधान करण्याची आवड होती पण नीटनेटके राहणे हा तिचा स्थायीभाव होता’, असे राणीने सांगितले.
दर्शन सिंह यांनी सांगितले की, ती आपल्याला बाबा म्हणायाची व तिच्या महत्त्वाकांक्षा तिने सांगितल्या होत्या. ती हुशार होती, आपल्याला पोलीस दलात जायचे आहे पण तिचे काय झाले ते बघा. आज खेडय़ात अनेक पोलीस असतात पण तिला आपले आयुष्य इतके कमी असेल असे वाटले नसणार. ती लांडेके येथील सरकारी हायस्कूलची विद्यार्थिनी होती, तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांने सांगितले की, ती हुशार होती.
सदर मुलगी व तिच्या आईवर बुधवारी चालत्या बसमध्ये विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला पण तो फसल्यानंतर या मुलीला बाहेर फेकण्यात आले. त्यात तिचा जखमी झाल्यानंतर मृत्यू झाला. सदर बस कंपनी बादल कुटुंबीयांच्या मालकीची आहे. तिच्या आईवर अजून मोगा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.