लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा हे देव नाहीत, असा निर्णय हिंदू संतांच्या ‘धर्म संसदे’ने घेतला आहे. ‘‘१९व्या शतकातील साईबाबा हे देव तर नाहीत, पण संत किंवा गुरूही नाहीत. त्यांची देवता म्हणून पूजा करता येणार नाही,’’ असा थेट निर्णयच या धर्म संसदेने घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी काही दिवसांपूर्वी साईबाबा हे देव नसून, त्यांच्या नावावर केवळ बाजार सुरू असल्याचे वक्तव्य केले होते. या मुद्दय़ावर विचारमंथन आणि चर्चा करण्यासाठी ‘दिव्य चातुर्मास महोत्सव समिती’ने रायपूरजवळील कावरधा येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ‘काशी विद्वत परिषदे’ने हा निर्णय घेतला. धर्म संसदेचे प्रसिद्ध प्रमुख राजेश जोशी यांनी साईबाबांची यापुढे देवता म्हणून उपासना करू नये, असे घोषित केले. या बैठकीला १३ आखाडय़ांचे प्रतिनिधी आणि अन्य धार्मिक नेते उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिर्डीच्या ‘श्री साईबाबा संस्थान’लाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. मात्र साईबाबा यांची बाजू मांडण्यासाठी दिल्ली आणि अहमदाबाद येथील साईबाबांचे काही भक्त या बैठकीला उपस्थित होते. साईभक्त आणि आखाडय़ातील साधू यांच्यात चर्चा होण्याआधीच या ठिकाणी जोरदार वाद झाला. आखाडाप्रमुखांनी साईभक्तांना व्यासपीठावरून हाकलून दिले आणि चर्चा करून साईबाबा हे देव नसल्याचा ठराव मंजूर केला.

धर्म संसदेतील ठराव
* साईबाबा हे देव, संत किंवा धार्मिक गुरू नाहीत.
* शालेय अभ्यासक्रमात हिंदू धर्मग्रथांचा समावेश.
* देश व्यसनांपासून मुक्त करणे महिलांची सुरक्षा
* अयोध्येत राम मंदिर बांधणेगाईचे रक्षण करणे