भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वाजपेयी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला झापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेला वेग मिळेल असे वाटत होते मात्र तसे झाले नाही असे सिन्हा यांनी म्हटले आहे. यशवंत सिन्हा यांच्या या भूमिकेला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिन्हा यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. नोटाबंदीचा निर्णय घेऊन आता वर्ष पूर्ण होईल, तसेच जीएसटीमुळेही देशाचे नुकसान झाले आहे अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.

भाजपवर टीका करणे हे आमचे लक्ष्य नाही. मात्र जो निर्णय चुकला आहे त्याचे समर्थनही होऊ शकत नाही असेही राऊत यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिेलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचे काय दुष्परिणाम देशाला भोगावे लागले यावर सिन्हा यांनी सविस्तर भाष्य केले आहे. या सगळ्याबाबत सामना या मुखपत्रातून शिवसेनेने भूमिका मांडली आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि त्यासारख्या अनेक योजना निष्फळ ठरल्या आहेत.

अनेक लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. देशातील ही परिस्थिती भीषण आहे असे सिन्हा यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मुद्द्यालाही शिवसेनेने सामनातील लेखातून पाठिंबा दिला आहे अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली. एवढेच नाही तर सिन्हा यांनी केलेले दावे सरकारने खोटे ठरवले तर आपल्याला आनंदच होईल असाही टोला राऊत यांनी लगावला.