भाजप म्हणजे सत्तांध पक्ष आहे. सत्ता आली म्हणून त्यांना काही दिसत नसल्याची खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते शनिवारी गोव्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सत्तेत आल्यापासून भाजपला काहीच दिसेनासे झाले आहे. मात्र, खुर्ची ही सत्ता राबविण्यासाठी असते, उबविण्यासाठी नव्हे, असा टोला उद्धव यांनी भाजपला लगावला. तसेच भाजपला गरज असेल तेव्हा शिवसेनेला मित्र म्हणून वागवते. मात्र, गरज सरताच त्यांच्यासाठी शिवसेना शत्रू होते, असा आरोपही उद्धव यांनी केला.  शिवसेनेच्या टीकेला भाजपकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गोव्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय दौऱ्याला आजपासून सुरूवात झाली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या सुभाष वेलिंगकर यांचीही उद्धव आज भेट घेणार आहेत. शिवसेनेने यापूर्वीच आगामी विधानसभा निवडणुकीत सुभाष वेलिंगकर यांनी स्थापन केलेल्या पक्षासमवेत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. गोवा निवडणुकीत बिगरभाजप आणि बिगरकाँग्रेस पक्षांचे नेतृत्व प्रादेशिक भाषेचे समर्थक करतील, असे शिवसेनेने म्हटले होते. वेलिंगकर यांनी स्थापन केलेल्या गोवा सुरक्षा मंच (जीएसएम) पक्षाकडे शिवसेनेने जागावाटपाचा औपचारिक प्रस्तावही सादर केला होता. त्यादृष्टीने आज उद्धव आणि सुभाष वेलिंगकर यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतला होता. ताकद दाखविण्यासाठी आणि भाजपकडून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीचा वचपा काढण्यासाठी या निवडणुका स्वबळावर लढविण्याकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कल असल्याचे समजते. युतीचा निर्णय शिवसेना स्थानिक पातळीवर घेणार नसून ठाकरे हेच घेणार आहेत. स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा, अशा सूचनाच ठाकरे यांनी गुरुवारी शिवसैनिकांना दिल्या होत्या. सत्तेत आल्यापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या कुरबुरी गेल्या दोन-अडीच वर्षांत विकोपाला पोहचल्या आहेत. त्यामुळे विधानसभेप्रमाणेच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर दोन्ही पक्ष विभक्त होतील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपला हिंमत असेल तर युती तोडून दाखवा, असे आव्हानही दिले होते.