भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी भूसंपादन विधेयकाविरोधात आता सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही शड्डू ठोकले आहे. भूसंपादन विधेयकासंदर्भातील बदलांची यादी निश्चित करून ती संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधकांच्या बैठकीला शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ देखील हजर होते. त्यामुळे भूसंपादन विधेयकाविरोधात सत्ताधारी शिवसेनेची विरोधकांना साथ मिळाल्यास भाजपसमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि माकपचे नेते उपस्थित होते. बैठकीत भूसंपादन विधेयकातील अपेक्षित बदलांबाबत चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसने मंगळवारी भूसंपादन विधेयकातील सुधारणांची यादी संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवून दिली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष देखील येत्या काही दिवसांत संयुक्त समितीसमोर भूसंपादन विधेयकातील अपेक्षित बदलांची यादी सादर करणार आहे. भाजपचे खासदार अहुवालिया यांच्या नेतृत्त्वाखालील संसदेच्या संयुक्त समितीकडे येत्या ५ ऑगस्टपर्यंत विरोधकांना भूसंपादन विधेयकातील अपेक्षित बदलांचा अहवाल सादर करायचा आहे.