मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याची विनंती शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने राधामोहन सिंह यांच्याकडे गुरुवारी केली. केंद्राला मदतीचे साकडे घालून शिवसेनेने राज्य सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर असताना दिल्लीत सेना खासदारांनी केंद्रावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. राधामोहन सिंह यांनी दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तरी प्रत्यक्षात मदतीचा चेंडू राज्य सरकारकडे टोलवला आहे. राज्य सरकारने निवेदन (मेमोरेंडम) धाडल्यानंतरच आम्ही पथक पाठवू, असे राधामोहन सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केले. यावेळी आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, भावना गवळी, गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, श्रीरंग बारणे, अनिल देसाई उपस्थित होते. राधामोहन सिंह यांच्याशी बोलताना अनंत गीते म्हणाले की, राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. त्याची पाहणी करून केंद्र सरकारने तात्काळ आर्थिक मदत घोषित करावी.
लोकसभेत मुद्दा उपस्थित
लोकसभेत शून्य प्रहरात शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिएकर २० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली. ते म्हणाले की, २०१३ मध्ये अतिवृष्टी तर यंदा अत्यंत कमी पाऊस राज्यात झाला. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ एक-दोन पोती उत्पन्न मिळाले. जे पेरले, त्यापेक्षाही हे कमी उत्पन्न आहे. आधारभूत किमतीपेक्षाही कमी पैसे शेतकऱ्यांना मिळाले. कापसाची आधारभूत किंमत चार हजार पन्नास रुपये असताना प्रत्यक्षात बाजारात तीन हजार रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे सरकारने कापूस व सोयाबीन आधारभूत किमतीवरच खरेदी करण्याची विनंती तुमाने यांनी केली. दुष्काळाचा सामना करण्यासाठी तातडीने पावले न उचलल्यास शेतकरी आत्महत्या करतील, अशी भीती तुमाने यांनी व्यक्त केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिएकर २० हजार रुपये देण्याची मागणी तुमाने यांनी केंद्राकडे केली.