राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची विनंती शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना केली. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या नेतृत्वाखाली सेना खासदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राधामोहन सिंह यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी शिष्टमंडळास दिले. अर्थात जोपर्यंत राज्य सरकारकडून मागणी होत नाही, तोपर्यंत केंद्र सरकार कोणतीही मदत घोषित करणार नसल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.      
शिष्टमंडळात खा. गजानन कीर्तिकर, श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत, रवी गायकवाड यांचा समावेश होता. अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा व काजूच्या बागांचे ७० टक्क्यांपेक्षाही जास्त नुकसान झाले आहे.  नाशिकमध्ये कांदा, द्राक्षे तर नागपूरमध्ये संत्र्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पावसामुळे राज्यातील रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात दुष्काळ असल्याचे सेना खासदारांनी राधामोहन सिंह यांच्या निदर्शनास आणून दिले. गतवर्षी राज्यात ५ हजार ८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तर यावर्षी जानेवारीत १३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.