शिवसेनेच्या ५६ पैकी ५५ जणांची, तर राष्ट्रवादीच्या ४३ पैकी ४२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आदी उत्तर भारतीय पक्षांबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही दिल्लीतील तीन महापालिका निवडणुकांमध्ये अजिबात डाळ शिजली नाही. शिवसेनेच्या ५६ पैकी ५५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४३ पैकी ४२ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.

शिवसेनेने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएममधील कथित घोटाळ्यावर फोडले. हा निकाल मान्य नसल्याने आम्ही ईव्हीएमविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे दिल्लीप्रमुख नीरज सेठी यांनी दिली. मोहनसिंग (वॉर्ड क्रमांक ४५ आणि मते २२३५) यांचा सन्माननीय अपवादवगळता शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची नाचक्की झाली. शिवसेनेचा एकही महत्त्वाचा नेता प्रचारासाठी आला नव्हता किंवा दिल्ली शाखेने कोणालाही बोलाविले नसल्याचे समजते. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे दिल्लीचे संपर्कप्रमुख आहेत. २०१५मधील विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचे उमेदवार नुसते नावाला उभे होते. उत्तर प्रदेशातील निवडणुकीतही शिवसेनेला एखाददुसऱ्या ठिकाणी उल्लेखनीय मते मिळविण्यात यश आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचीही स्थिती काही वेगळी नाही. दिल्लीतील पक्षाचे अस्तित्व तोळामासा आहे.

उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली महापालिकेच्या बुधवारी घोषित झालेल्या २७० जागांपैकी तब्बल १८१ जागा जिंकून भाजपने सर्वाना धोबीपछाड दिला. आम आदमी पक्ष व काँग्रेस या प्रमुख पक्षांना जेमतेम कामगिरी करता आली. पण भाजपच्या या लाटेमध्ये अन्य पक्षांची चांगलीच वाताहत झाली. बिहारी (पूर्वाचली) मतदारांवर डोळा ठेवून संयुक्त जनता दलाने (जेडीयू) मोठा गवगवा केला होता. खुद्द नितीशकुमारांनी दोन सभा घेतल्या. पण त्यांच्या सर्वच्या सर्व ९४ उमेदवारांना अनामत रकमा गमवाव्या लागल्या. अशीच स्थिती बसपावर (२०९ पैकी १९४) आणि समाजवादी पक्षावर (२७पैकी २५) ओढविली. अगदी काँग्रेससारख्या जाळे असलेल्या पक्षाच्या ९२ उमेदवारांनाही स्वत:ची अब्रू वाचविता आली नाही.

untitled-9