अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर भाजपकडून घटकपक्षांच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करणार येणार असल्याची चर्चा आहे. यावेळी भाजपकडून घटकपक्षांशी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भाच चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करायचीच असेल तर ती मातोश्रीवरच होईल, असा पवित्रा सेनेने घेतला आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यात सुसंवाद राहावा यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे दोन ज्येष्ठ मंत्री गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांना भेटून पाडवा निमंत्रण देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र दोन्ही पक्षांचे संबंध सुरळीत असल्याचे सांगत मातोश्रीवर जाण्याचे कोणतेही प्रयोजन नसल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मातोश्रीवरही उत्तम भोजन आणि पाहुणचार केला जातो, असे सांगत चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) स्नेहभोजनाच्या चर्चा या फक्त माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. मात्र, शिवसेनेशी कोणताही चर्चा करायची असल्यास ती मातोश्रीवरच होईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांच्याकडून राष्ट्रपतीपदासाठी अनपेक्षितपणे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचविण्यात आले. उद्धव ठाकरे यांनाही मोहन भागवत राष्ट्रपती व्हावेत असे वाटते. हिंदू राष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल तर भागवत यांना राष्ट्रपती करायला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने हिंदुत्त्ववादी नेता देशाच्या पंतप्रधानपदी आहे. तर नुकतीच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्याची निवड करण्यात आल्याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

जुलैच्या सुरुवातीला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत भाजपकडे २० हजार मते कमी आहेत. अण्णा द्रमुकच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर सुमारे २५ हजार मूल्य असलेली शिवसेनेची मते भाजपच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या यशानंतर भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली. तरीही विजयासाठी २० हजार मतांचे मूल्य कमी पडत आहे. अण्णा द्रमुक किंवा बिजू जनता दलाला बरोबर घेऊन मतांचे गणित जुळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तामिळनाडूतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्ताधारी अण्णा द्रमुकच्या पाठिंब्याबाबत भाजपमध्ये काहीशी धाकधूक आहे. भाजप नेत्यांच्या सूचनेवरूनच तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शशिकला यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यास विलंब लावला होता. तसेच माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांना भाजपने ताकद दिली. अण्णा द्रमुकमध्ये फूट पाडण्याचे अजूनही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. या साऱ्या घडामोडींमुळे अण्णा द्रमुकचे नेते भाजपवर नाराज आहेत. ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी बिजू जनता दलाला भाजपने आव्हान दिले. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे हातचे राखून मदतीबाबत निर्णय घेऊ शकतात. अशा परिस्थितीत २५ हजार मतांचे मूल्य असलेल्या शिवसेनेची मते भाजपकरिता निर्णायक ठरू शकतात. आधीच २० हजार मूल्य असलेली मते कमी पडत असताना शिवसेनेने वेगळी वाट पत्करल्यास २५ हजार मूल्य असलेल्या मतांचा खड्डा पडू शकतो.

     लोकसभेचे १८ आणि राज्यसभेचे तीन खासदार – एकूण २१
    संसद सदस्याच्या एका मताचे मूल्य ७०८ ७ २१ = १४,८६८
    विधानसभा सदस्य – ६३ (विधान परिषद सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो.)
    महाराष्ट्रातील आमदारांच्या एका मताचे मूल्य – १७५
    १७५ ७ ६३ = ११,०२५
    संसद सदस्य आणि विधानसभा आमदारांचे एकूण मतांचे मूल्य – २५ हजार ८९३.