राज्यातील सत्ता सहभागावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता विकोपाला जाताना दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान, कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेले शिवसेना खासदार सुरेश प्रभू यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्विकारल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. प्रभू यांनी रविवारी सकाळी शपथविधी आधीच भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्विकारल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळामध्ये सुरेश प्रभू यांच्या समावेशासाठी भाजप आग्रही होती. मात्र, प्रभूंना मंत्रिपद द्यायचे असल्यास भाजपच्या कोट्यातून दिले जावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. राजापूर मतदारसंघातून चार वेळा सुरेश प्रभू शिवसेनेकडून निवडून आले होते. युती सरकारच्या काळात पर्यावरण, उद्योग आणि उर्जामंत्रीपदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील केंद्रातील युती तुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रातील शिवसेनेचे एकमेव मंत्री अनंत गीते यांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुंबईत सध्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची चर्चा सुरू आहे. 
 तत्पूर्वी शिवसेनेने शपथविधीच्या कार्यक्रमाला गैरहजर राहत आक्रमक भूमिका घेतली होती. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत दाखल झालेले शिवसेना खासदार अनिल देसाई विमानतळावरूनच मुंबईत परतले. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार नसल्याची माहिती पत्रकारांना दिली. राज्यातील सत्तेत सहभागी होण्यासंदर्भात शिवसेना आणि भाजप यांच्यातील चर्चेत समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी सकाळपासून सेना आणि भाजप यांच्यात सकारात्मक चर्चा होताना दिसत होती. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या खासदारांचा समावेश केला जाणे अपेक्षित होते. यादृष्टीने शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि चंद्रकांत खैरे दिल्लीमध्ये दाखलही झाले होते. मात्र, मधल्या काळात चर्चा फिस्कटल्याने अनिल देसाईंनी राष्ट्रपती भवनाकडे जाण्याऐवजी विमानतळावरूनच माघार घेतली.
या संपूर्ण घटनाक्रमातील ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे: 

* सत्तेसाठी लाचारी पत्करणार नसल्याचे उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण
* राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यास भाजपची साथ सोडण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा
* शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या निवडीची घोषणा
* युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही सेनाभवनातील बैठकीला उपस्थित
* शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सेनाभवनात दाखल
* शिवसेना भवनातील बैठकीसाठी उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना
* शिवसेनेचे खासदार आणि आमदार शिवसेना भवनात उपस्थित
* अनिल देसाईंच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी
* शिवसेना भवनात संध्याकाळी आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे  पक्षाची पुढील रणनीती ठरवणार
* शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होण्याची शक्यता
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीला, राज्यातील शिवसेनेच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता
* नवे कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभूंनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले
* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार
* सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, विनायक राऊत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
* अनंत गिते यांच्या राजीनाम्याबद्दल उद्धव ठाकरे संध्याकाळी निर्णय घेणार
* शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपद नाकारले, भाजपने राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट न केल्याने निर्णय
* शिवसेनेविना मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न