नवरात्रौत्सवात शिवसेना आक्रमक झाली आहे. गुरुग्राममध्ये शुक्रवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांसविक्रीची अवैध दुकाने बंद केली. नवरात्रौत्सवाच्या काळात शहरातील मांसविक्रीची अवैध दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी याआधीच प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे आतापर्यंत येथील ५० टक्के दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. पण प्रशासनाने आदेश देऊनही काही दुकाने सुरू होती. ती शिवसेना कार्यकर्त्यांनी आज बंद केली, अशी माहिती पक्षाचे स्थानिक नेते रितू राज यांनी दिली. मात्र, शिवसेनेच्या या कृतीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून राज्यातील अवैध कत्तलखान्यांविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली होती. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार, राज्यभरातील कत्तलखाने बंद करण्याबाबत कृती आराखडा तयार करावा असे निर्देश त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी त्यांनी १७ कलमांची नियमावली तयार केली होती. त्यानुसार उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळापासून ५० मीटरच्या आत आणि त्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मीटरच्या अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारची मांस विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती.