पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणावर शिवसेनेने नेहमीच्या खोचक शैलीत निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल आपल्या भाषणात म्हटले होते की, काश्मीरचा प्रश्न बंदुकीच्या धाकाने किंवा काश्मिरी लोकांवर टीका करून सुटणार नाही. त्यासाठी काश्मिरी लोकांना आपले मानून जवळ केले पाहिजे. या आणि भाषणातील आणखी काही मुद्द्यांच्या अनुषंगाने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मोदींचा समाचार घेण्यात आला. भारतीय सैनिकांनी आता हातामधील बंदुका खाली टाकून काश्मिरी लोकांना मिठ्या माराव्यात, असा सणसणीत टोला शिवसेनेने मोदींना लगावला.

काश्मीरचा हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी आपण जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय, देशही निःशब्द झाला असेल. ‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते. आता हा विचार अमलात आणण्यासाठी एकच करा. कश्मीरातील ३७० कलम लगेच हटवून टाका. म्हणजे देशभरातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी कश्मीरात जातील व तेथील लोकांच्या गळाभेटी घेतील. सैनिकांनो, बंदुका मोडा व कश्मिरींना मिठ्या मारा. पंतप्रधानांच्या जोरदार भाषणाचे आम्ही स्वागत करीत आहोत, असे अग्रलेखात म्हटले आहे.

याशिवाय, पंतप्रधान मोदींचे भाषण म्हणजे नेहमीचे गुद्दे गायब व फक्त मुद्देच मुद्दे असे असल्याची टीकाही सेनेने केली. आपला देश बुद्धांचा आहे, महात्मा गांधींचा आहे. आस्थेच्या नावावर सुरू असलेल्या हिंसेचे समर्थन करू शकत नसल्याचे मोदी यांनी सांगितले, पण त्यात नवीन काय? हे सर्व काही जुनेच आहे व असेच काही लाल किल्ल्यावरून बोलण्याची परंपरा असल्याचे खडे बोल शिवसेनेने सुनावले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी आस्थेच्या नावाखाली हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असे आपल्या भाषणात म्हटले होते. परंतु, आस्थेच्या नावावर हिंसा कोण करीत आहे व त्यामागची कारणे काय आहेत? मावळलेले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मुसलमानांना देशात असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य करताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली. संघ विचारक लोकांनी अन्सारी यांना देश सोडण्याची धमकी दिली. हमीद अन्सारी यांनी व्यक्त केलेली भीती व मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आस्थेच्या नावावर हिंसाचार चालणार नसल्याची घेतलेली भूमिका यात सांगड दिसतेच आहे, असे सांगत सेनेने मोदींवर निशाणा साधला.