माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आपले आत्मचरित्र लिहिले असले तरी त्यामध्ये त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या कारकिर्दीत देशावर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा पुसटसाही उल्लेख करणे त्यांनी टाळले आहे.
‘ओडिसी ऑफ माय लाईफ’ या आपल्या चरित्रात माजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपला राजकारणातील प्रवास, शिक्षण क्षेत्राविषयीची, विवाहाविषयक कायद्यांबाबतची आपली मते आणि तंत्रज्ञानाविषयीची आत्मीयता त्यांनी मांडली आहे. तर ‘गृह मंत्री’ या प्रकरणात त्यांनी केंद्र-राज्य संबंध, पंचवार्षिक योजना, दहशतवाद आणि नक्षलवाद आदींवर भाष्य केले आहे. मात्र मुंबईवरील दहशतवादी हल्ले आणि त्याबाबत गृहमंत्र्यांची जबाबदारी याविषयी त्यांनी काहीही बोलणे टाळले. मात्र रालोआ सरकारच्या कार्यकाळातील कंदाहार विमान अपहरण प्रकरणावर त्यांनी सविस्तर लिखाण केले आहे.