उत्तर प्रदेशात अवैध कत्तलखान्यांवर सरकारने कारवाईचा धडाका लावला असतानाच इतर राज्यांमध्येही चिकन, मटन दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तर हरयाणातील गुडगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांस आणि चिकनची ५०० हून अधिक दुकाने बंद केली आहेत. त्यात ‘केएफसी’चाही समावेश आहे.

गुडगावमध्ये जवळपास २०० शिवसैनिकांनी मांसविक्रीच्या दुकानांवर धडक दिली. नवरात्रीपर्यंत सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. तसेच दर मंगळवारी मांसविक्रीची दुकाने बंद ठेवावीत, असा इशारा शिवसैनिकांनी दुकानदारांना दिला आहे. शिवसैनिकांनी केएफसीमध्ये जाऊन तेथील ग्राहकांनाही बाहेर काढले आणि दुकान बंद केले. या कारवाईसाठी स्थानिकांनी आम्हाला मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे, असा दावा शिवसेनेने केला आहे. स्थानिकांनीच मांसविक्रीची दुकाने नवरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी केली होती. त्यामुळेच दुकाने बंद करण्यासाठी कारवाई करावी लागली, असेही शिवसेनेने स्पष्ट केले आहे. या कारवाईसाठी शिवसेनेने आधीच पोलीस आणि प्रशासनाची परवानगी घेतली होती, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या कारवाईसंदर्भात पोलिसांना आणि प्रशासनाला आधीच माहिती होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असेही सांगण्यात येत आहे.

या कारवाईसंदर्भात आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. वैध दुकाने बंद करण्यात आली असतील तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे गुडगाव पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर इतर राज्यांमध्येही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंडमध्येही मांसविक्रीच्या दुकानांवरही धडक कारवाई सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये जवळपास चार हजार दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.